Breaking News

गावगाडा आणि दुर्बल घटकांचे शोषण


राजकारण हे अर्थकारणावर चालत असल्याची नित्याने अनुभूती येते. धनदांडग्यांच्या हातात सत्तेची सुत्रे असल्याचे सर्वत्र चित्र दिसते. ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी नाही.गावगाड्याचे चाकही याच चक्रव्युहात अडकलेले आहे. होतकरु, अभ्यासू, कार्यक्षम, स्वतःची दृष्टी असलेले सामान्य लोक या स्पर्धेत टिकत नाहीत. घराणेशाहीतुन जपलेला पारंपारिक वारसा, येनकेन मार्गांच्या अवलंबातुन जमवलेली माया आणि जनतेला भुलभुलैय्या करण्याचे तंत्र अवगत असलेलेच राजकारणात यशस्वी होताना दिसतात. ग्रामीण भागात उगाळलेल्या वाटेवरून चालण्याच्या लोकांच्या मानसिकतेचा पुरेपुर फायदा उठवत मोजकेच लोक गावगाड्याचे चालक राहिलेले आहेत.
परंपरांच्या छायेत वाढलेल्या हुकमी एक्क्यांची ताकद ग्रामीण भागात चालताना दिसते. ही ताकद लोकशाही आणि सामाजिक मुल्यांवर चालल्यावर दुमत असण्याचे कारण नाही. मात्र अनेकदा तसे होताना दिसत नाही. सामान्य जनतेचे अज्ञान, त्यांची मजबुरी, जातीव्यवस्था, आर्थिक दुर्बलता अशा बाबींचा फायदा उठवला जातो. पुढे याचाच हातखंडा बनत जातो, आणि ते फोफावत जाते.
ग्रामीण भागात बहुतांश जनता पोटार्थी असते. त्यांची जीवनपध्दती साचेबद्ध बनलेली असते. आर्थिक दुर्बलतेने अनेकांना असुरक्षीततेच्या भावनेने ग्रासलेले असते. कोणाचा तरी आधार, वरदहस्त असावा, त्यामुळे कोणाच्या तरी छायेखाली राहणे ते पसंत करतात.नेमक्या याच मजबुरीचा फायदा उठवत त्यांची भांडवलदारांकडुन पिळवणूक सुरु होते.गोरगरिबांच्या मालमत्तेवर डोळे ठेवून असणारी मंडळी संधी शोधत असतात. फुकटचा मोठेपणा देवून पोसलेले त्यांचे स्तुतीपाठक अशा पिडिताला घेरतात, आणि पुढे त्यांच्या मजबुरीतुन फायदा उठवला जाण्याचे प्रकार गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणावर घडले. यातुन दुर्बल घटकांचे मोठ्या प्रमाणावर शोषण करण्यात आले. महसूल आणि पंचायत राज यंत्रणा सोयीनुसार वापरून हे प्रकार घडुन गेले. 2005 नंतर माहिती अधिकार कायद्याने या गोष्टींना बराच आळा बसलेला दिसत आहे.
आमच्यासारखे आम्हीच आहोत, दुसरा कोणी होवू शकत नाही, आणि तसा प्रयत्न केला तरी तो मुळासकट उपटुन टाकू अशा अविर्भावात जगण्याची शैली असलेले ग्रामीण भागात काही लोक दिसतात. वर्षानुवर्षे गावगाडा हाकण्याच्या अनुभवातून आलेली ही मुजोरी असते. दुसर्‍याचे विचार स्वीकारण्याची मानसिकता नसलेल्या डोक्यात सतत स्वयंभूपणाचे भूत वावरत असते. सदोदित मनासारखे घडत असल्याने दुसर्‍यांच्या विचारांना किंमत देणे त्यांना जमत नाही. यातूनच त्यांच्यातील हुकुमशाही प्रवृत्ती पोसली गेली. त्यातुन समाजाला गृहीत धरण्याची मानसिकता तयार झाली. गोरगरीब व सामान्य जनता त्यांच्या एकाधिकारशाहीला बळी पडत गेली. हे गावगाड्याचे वैशिष्ट्य बनले. यावर मात करण्यासाठी वैचारिक प्रगल्भता, शिक्षण, स्वप्रकटता, निर्भीडता आणि त्याला परिवर्तनवादी विचारांची जोड देण्याची गरज आहे. सध्या समाजाची वाटचाल त्या दिशेने सुरु आहे. युवकांनी संघटित होवून गावागावांत जनजागृती मोहीम राबवून सक्रियता दाखविली, तर ग्रामीण चित्र पूर्णपणे पालटल्याशिवाय राहणार नाही.