Breaking News

अ‍ॅट्रोसिटी कायदा अधिक बळकट करण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)- फोफावलेल्या जातीयवादाचे प्रतिबंध होवून, मागासवर्गीयांना संरक्षण मिळण्यासाठी अ‍ॅट्रोसिटी कायदा अधिक बळकट करण्याच्या मागणीसाठी तथागत प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित आक्रोश मोर्चा काढण्यात आला. जय भिमच्या घोषात निघालेल्या मोर्चात युवक निळे झेंडे घेवून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच महिलांनी देखील मोर्चात सहभाग नोंदवला.
मार्केट यार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. बंगाल चौकी, बुरुडगल्ली, हातमपुरा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागासवर्गीयांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ व अ‍ॅट्रोसिटी कायदा अधिक बळकट करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणानून निघाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात संजय कांबळे, अमित काळे, पन्नालाल लसगरे, सिध्दार्थ आढाव, अशोक केदारे, दया गजभिये, दिपक गायकवाड, गणेश कांबळे, सुबोध वाघचौरे, सागर भिंगारदिवे, उदित आल्हाट, हरीश उघडे, संपदा म्हस्के, आरती बडेकर, सुनिता घोडके, अण्णासाहेब गायकवाड, संध्या मेढे, बाजीराव भिंगारदिवे, राहुल आंगरे आदि झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी प्रमुख पदाधिकारींची भाषणे झाले. देशात मोठ्या प्रमाणात जातीयवाद फोफावत असताना देखील अ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. जातीयवादी शक्तींनी नितीन आगे, सागर शेजवळ व सोनई तिहेरी हत्याकांड सारखे ह्रद्यहेळविणार्‍या घटना घडल्या. अशा घटनेत दिवसंदिवस वाढ होत आहे. सर्वच्या सर्व अ‍ॅट्रोसिटीच्या केसेस खोटे नसल्याचे सिध्द झालेले आहे. मात्र अत्याचारग्रस्त मागासवर्गीय बांधव पोलिस स्टेशनला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीत असल्यास त्याला अनेक फाटे फोडले जात आहे. ग्रामीण भागात मागासवर्गीयांना अजूनही समानतेची वागणुक मिळत नसून, मोठ्या प्रमाणात जातीयवाद होताना दिसत आहे. अ‍ॅट्रोसिटी कायद्याने जातीयवादींवर वचक होता. मात्र या कायद्यात बदल केल्याने त्यांनी पुन्हा आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जातीयवादी प्रवृत्तींचा प्रतिबंध करण्यास अ‍ॅट्रोसिटी कायदा अधिक बळकट करण्याच्या मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मोर्चात सहभागी महिलांच्या हस्ते निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले. या मागणीचे दखल न घेतल्यास विधान भवना समोर अर्ध नग्न आंदोलन करण्याचा इशारा तथागत प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात अला आहे.