परजणे करणार दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च
कोपरगाव शहर प्रतिनिधी
खिर्डी गणेश शाळेच्या दहावीपर्यंतच्या दोन विद्यार्थ्यांचा शालेय खर्च गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक राजेश परजणे यांनी देण्याची ग्वाही नुकतीच दिली. स्व. नामदेवराव परजणे {अण्णा} यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी हा निर्धार केला.
खिर्डी गणेश जिल्हा परिषद शाळेतील पाचवीचा विद्यार्थी योगेश भाऊसाहेब सातळकर आणि सहावीची विद्यार्थिनी श्रद्धा अप्पासाहेब खोकले हे दोन्ही विद्यार्थी गरीब परिवारातील आहेत. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. त्यांना भविष्य घडविण्यासाठी हातभार लागावा. म्हणून परजणे यांनी त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करण्याची जबाबदारी उचलली आहे. दिवंगत नेते नामदेवराव परजणे {अण्णा} यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत, भविष्यात ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. शिक्षणातून समाजाला हातभार लावण्यासाठी अशा विद्यार्थ्यांचा उपयोग झाला पाहिजे, असे स्वप्न बाळगले होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी पुढाकार घेतल्याचे राजेश परजणे यांनी सांगितले. दरम्यान, या दोन्ही विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सरपंच सरला चांदर यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी दूध संघाचे संचालक अंबादास वराडे, सोपान चांदर, ग्रामपंचायत सदस्य रमेश भास्कर, सोनजे, केंद्रप्रमुख श्रीमती भोईर यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
