Breaking News

दखल राष्ट्रवादीचं हसं झालं

हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागं लागायचं, ही वृत्ती अंगलट येत असते. राष्ट्रवादीला सध्या तसा अनुभव येत आहे. बीड जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व वाढू नये, असं वाटणारा एक मोठा वर्ग आहे. या वर्गानं मुंडे यांनी राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेत येत असलेली सत्ता घालविली. त्यासाठी बंडखोरी केली. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुुंडे यांना मदत करून त्यांच्या ताब्यात जिल्हा परिषद दिली. धनंजय मोठे होऊ नयेत, यांचे पाय कापण्याचा प्रयत्न झाला. बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादीनं हट्टानं काँगे्रसकडून मागून घेतला. त्यामुळं काँग्रेसही नाराज होती. त्या बदल्यात राष्ट्रवादीचा हक्काचा असलेला परभणी-हिंगोली मतदारसंघावर राष्ट्रवादीनं पाणी सोडलं. तो काँग्रेसला दिला. तेथील आमदार बाबा दुर्राणी यांना थांबायला भाग पाडलं. त्यामुळं राष्ट्रवादी तिथं नाराज होती. काँग्रेस व राष्ट्रवादीकडं जास्त मतं असताना या मतदारसंघातून शिवसेना विजयी झाली. विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांत तीन राष्ट्रवादीचे होते. कोकणात सुनील तटकरे यांनी मतं कमी असतानाही ती जागा राखली. त्यात त्यांचं कर्तृत्त्व दिसलं; परंतु तिथंही तटकरे यांच्या घराणेशाहीवर टीका झाली. नाशिकमध्ये मतदान कमी असतानाही जागा लढविली. भाजपनं पाठिंबा देऊनही ती जागा जिंकता आली नाही. परभणीची जागा तर वाटपात काँग्रेसला गेली होती. त्यामुळं ती ही गेलीच. बीड-लातूर-उस्मानाबाद मतदारसंघात बरंच कवित्त्त्व घडलं. तिथं ताईंनी भाऊला धक्का दिला. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना त्याचं श्रेय दिलं असलं, तरी राष्ट्रवादीतील बेदिलीमुळं एक आमदार कमी झाला आणि धनंजय यांचे पाय खेचण्यात यश आलं, याचं समाधान मानणारा राष्ट्रवादीतच एक गट आहे, हे ही प्रकर्षानं दिसलं.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेत सर्वाधिक सदस्य होते. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळं धनंजय यांचं विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आलं आहे. बीड-उस्मानाबाद-लातूर हा मतदारसंघ हक्कानं मागून घेतल्यामुळं त्यात विजय मिळविण्यासाठी धनंजय मुंडे कामाला लागले. त्यांनी रमेश कराड यांना राष्ट्रवादीत आणून भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न जरूर केला; परंतु त्यांचे राजकीय आखाडे चुकले. कराड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली; परंतु कधी कधी पदापेक्षा भावनिक राजकारण महत्त्त्वाचं ठरतं. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यापुढं आपण कुणालाही भाऊ म्हणणार नाही, असं सांगितलं. त्यांच्यावर झालेला दुसरा मोठा आघात होता. मुंडे कुटुंबाशी कराड कुटुंबाचे चांगले संबंध आहेत. गोपीनाथ मुंडेे यांनी केलेली मदत एमआयटीचे विश्‍वनाथ कराड विसरले नसतील. शिक्षण सम्राटांना सरकारच्या विरोधात जाऊन चालत नाही. पंकजा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्‍वनाथांनाच साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी आपला पुतण्या रमेश यांची समजूत घातली. घरात आमदारकी असल्यापेक्षा सत्तेचा आशीर्वाद महत्त्त्वाचा असतो, हे त्यांच्याइतकं चांगलं कुणीच ओळखू शकत नाही. त्यामुळं कराड यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी ऐनवेळी नाकारली. जे अशोक जगदाळे गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते, त्यांनाच उमेदवारी करण्याची गळ घालण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली; परंतु राजकीय होकायंत्र असलेल्या पवारांवर मात करता येते, हे भाजपनं दाखवून दिलं. या मतदारसंघातील एक हजार मतदारांपैकी 525 हून अधिक मतदार राष्ट्रवादी व काँग्रेसकडं असताना तिथं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 452 मतं पडतात आणि एकेकाळी अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि आता भाजपचे उमेदवार असलेल्या सुरेश धस यांना भाजपकडं असलेल्या मतांपेक्षा शंभर जास्त मतं मिळतात, यावरून अंकाचं गणित जुळविण्यात राष्ट्रवादी कशी तोंडघशी पडली. काँग्रेसनंही राष्ट्रवादीला कशी साथ दिली नाही, हे निकालावरून स्पष्ट होतं. कधी कधी जास्त जागा असूनही मित्रपक्षाला विश्‍वास देण्यात कमी पडलो, तर अपयश येतं, त्याचं परभणी आणि बीड ही दोन उत्तम उदाहरणं आहेत.
विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पˆतिष्ठेच्या लढतीत भाजपनं बाजी मारली आहे. भाजपने उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीला अपरिपक्व राजकारण आणि अतिआत्मविश्‍वास नडला, अशी जी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली आहे, ती कुणाला उद्देश्ाून आहे, हे वेगळं सांगायला नको. सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवायचं आणि मर्यादित मतदारसंघात घालवायचं, असं धनंजय यांच्याबाबतीत व्हायला लागलं आहे. त्यांचे पाय ओढून त्यांना अडचणीत आणणरे स्वकीयच आहेत. पंकजा यांचं बीड जिल्ह्यावरचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे. प्रदेश भाजपतही त्यांचं वजन वाढलं आहे. अशोक जगदाळेंच्या पराभवासोबतच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे पंकजा मुंडे यांनी मनोबल वाढणार असून, पक्षातही त्यांचं वजन वाढणार हे स्पष्ट आहे.खंडपीठाने निवडणूक विभागास मतमोजणी तत्काळ घेण्यास सांगितले, त्यावर निवडणूक आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज (मंगळवार) मतमोजणीचा निर्णय घेतला.