निरपराधांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले : ढाकणे
जामखेड / श. प्रतिनिधी
पंधरा दिवसांत चौंडी प्रकरणातील निरापधांवर दाखल केलेले खोटे मागे घ्या, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. आरक्षणासाठी आवाज उठविला व आरक्षण मागितले, एवढाच त्यांचा गुन्हा झाला, पालकमंत्री राम शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली. आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून चोंडी येथील आहिल्यादेवींच्या जयंतीदिनी आपल्याच समाजाच्या निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कोठारी, मधूकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, शरद शिंदे, अवधूत पवार, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, अमित जाधव, सचिन हळनावर, नितीन हूलगूंडे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलतांना ढाकणे म्हणाले की, पालकमंत्री सत्तेच्या मस्तीत असून द्वेषाचे राजकारण करत आहेत, आज त्यांच्याकडे सत्ता-पैसा आहे. प्रशासनाचा दूरूपयोग करत आहेत. जामखेडसह जिल्ह्यात जेंव्हा-जेंव्हा मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडल्या, तेंव्हा पालकमंत्री जाणूनबुजून बाहेर गेले. पिडीत कुटूंबांच्या भेटीसाठी किंवा सांत्वनासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला नाही, असे प्रा. मधूकर राळेभात यांनी सांगितले.
