समाजमनाला चटका लावणारी ‘एक्झिट’!
अहमदनगर प्रतिनिधी
अध्यात्मिक क्षेत्रात वावरत असतांना सामान्य आणि अल्पबुद्धीच्या लोकांना संसार, पाप-पुण्य, जीवनात उदभणार्या संकटांवर मात कारण्यासाठी मार्गदर्शन करणारे संतच जर अशी सहजासहजी ‘हार’ मानून जीवनयात्रा संपवित असतील तर सामान्यांनी कोणाकडे पहावे, असा प्रश्न राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांच्या आकस्मिक जाण्याचे उपस्थित होत आहे. त्यांची ही ‘एक्झिट’ समाजमनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या निधनाविषयी अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातील निवडक प्रतिक्रिया देत आहोत… संपादक.
संवेदनशील मनाचे अध्यात्मिक व्यक्तीमत्व हरपले :
भैयूजी महाराजांचे यांचे अचानक जाणे, हे सर्वांसाठी धक्कादायक आहे. अध्यात्माची जोड त्यांच्या जीवनाला मिळाली. शेतकर्यांच्या व गरिबांप्रति त्यांच्या मनाची करुणा फार मोठी असायची. अत्यंत संवेदनशील व्यक्तीमत्व त्यांचे होते. त्यांनी अनेक लोकाभिमुख योजना शेतकर्यांसाठी राबविल्या. संवेदनशिल मनाचे अध्यात्मिक व्यक्तीमत्व हरपले.
माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात.
**
अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी
समाजात एकात्मता वाढीस लावतांना पुरोगामी विचार जोपसणार्या भैय्यूजी महाराज यांनी अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. समाजकार्याबरोबर शेती, ग्रामसमृध्दी योजना, तिर्थक्षेत्र स्वच्छता अभियानात काम करुन जलसंधारणाबरोबर सामान्य माणसांमध्ये नवेचैतन्य उभे केले. राष्ट्रीय पातळीवरील या व्यक्तिमत्वाच्या आकस्मिक निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आ. डॉ. सुधीर तांबे
**
महाराष्ट्राचा अध्यात्मिक वारसा हरपला
भैय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. त्यांचे व्यक्तिमत्व कायम हसतमुख, उत्साही आणि उर्जा प्रदान करणारे होते. त्यामुळे त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे काम होते. विखे पाटील कुटुंबांशी त्यांचा जवळचा संबंध होते. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा वारसा हरपला.