Breaking News

साठवण तलावाच्या कामासाठी विशेष सभा बोलवा



कोपरगाव ता. प्रतिनिधी

चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी सर्वसाधारण सभेचा ठराव पाठविणे अपेक्षित होते. मात्र आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु होण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाच्यावतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना देण्यात आले.

यावेळी बोलतांना कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय आढाव म्हणाले, कोपरगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून कोपरगाव शहरातील नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा व्हावा, या दूरदृष्टीतून माजी आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही चार नंबर साठवण तलावासाठी सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. परंतु चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु झाल्यानंतर चौकशीच्या नावाखाली विरोधकांनी यामध्ये राजकारण आणून हे काम बंद पाडले आहे. हे काम तातडीने सुरु करावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी समक्ष भेटून, पत्रव्यवहार करून आणि वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आंदोलनेही केली आहेत. मात्र तरीही आजतागायत येसगाव येथील चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु झालेले नाही. यासंदर्भात सोमवारी {दि. ११ } युवा नेते आशुतोष काळे यांच्या सोबत नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची समक्ष भेट घेतली. काम सुरु होणेबाबत आचारसंहिता व इतर काही अडचणी आहे का, याची माहिती जाणून घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आचारसंहिता ही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आहे, असे स्पष्ट करीत चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्याचा व आचारसंहितेचा कुठलाही सबंध नाही, असा खुलासा केला. परंतु कोपरगाव नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेचा जो ठराव पाठवविणे अपेक्षित होते. तो ठराव जिल्हाधिका-यांकडे पाठविलेला नाही. तो ठराव पाठविल्यास रखडलेल्या चार नंबर साठवण तलावाचे काम सुरु होण्यास अनुकुलता दर्शविली. त्यामुळे कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांना चार नंबर साठवण तलावाचे काम तातडीने सुरु व्हावे, यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विजय आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, सुनील शिलेदार, वर्षा गंगुले, प्रतिभा शिलेदार, मंदार पहाडे, संदीप पगारे, माधवी वाकचौरे, सैदाबी शेख, दिनार कुदळे, नवाज कुरेशी, हिरामण गंगुले, दिनकर खरे, फकीर कुरेशी, राजेंद्र आभाळे, नितीन बनसोडे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. तुषार गलांडे, रावसाहेब साठे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, मुकुंद इंगळे, प्रसाद आढाव, बापू वढने, राजेंद्र जोशी, हारुण शेख, इम्तियाज अत्तार, नारायण लांडगे, चांद शेख, बाळासाहेब शिंदे, विशाल निकम, निखिल डांगे, तेजस साबळे, विकी जोशी, ऋषिकेश खैरनार, विलास बेंद्रे, शंकर घोडेराव, प्रसाद उदावंत, धनंजय लहारे, गणेश लकारे, बाला गंगुले, जनार्दन शिंदे आदी मान्यवर हजर होते.