Breaking News

अण्‍णासाहेबांनी राहुरीचे नाव उंचाविले : जोशी


राहुरी तालुका प्रतिनिधी

माणूस जीवंतपणी समाजावर राज्‍य करु शकतो. परंतु त्‍याच्‍या जाण्‍यानंतरही समाजावर राज्‍य करणे सोपे नाही. याला अपवाद अण्‍णासाहेबांचा आहे. त्‍यांच्‍या घराण्‍याची पुण्‍याई, त्‍यांच्‍यावर झालेले संस्‍कार आणि संघाकडून मिळालेल्‍या संस्‍काराची जोड या सर्वात एक जादू आहे. असे म्हणतात, राजकीय क्षेत्र अध:पतनाकडे नेते. परंतु अण्‍णासाहेबांना संघाचे संस्‍कार मिळाल्‍याने त्‍यांनी राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रातही राहुरीचे नाव उंचाविले आहे, असे प्रतिपादन राष्‍ट्रीय सेवक संघाचे सरकार्यवाह भैय्या जोशी यांनी केले आहे.

देवळालीप्रवरा येथे राजश्री कदम प्रतिष्‍ठानच्‍यावतीने अण्‍णासाहेब कदम पुतळा परिसर सुशोभिकरण, ओढे रुंदीकरण-खोलीकरण, देवळाली प्रवरा सोसायटीच्‍या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि वृक्षारोपण आदी कार्यक्रम भैय्या जोशी यांच्‍या हस्‍ते पार पडले. त्‍यावेळी ते बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी शिर्डी संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे हे होते. पश्चिम महाराष्‍ट्र प्रांतचे संघचालक नाना जाधव, राजश्री प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जगदिश कदम, अण्‍णासाहेब कदम शेती व ग्रामविकास प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष भगवान थोरात, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम, माजी आ.चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते.

जोशी म्‍हणाले, १९२५ ते १९४८ या कालखंडात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या पायाभरणीमध्‍ये अण्‍णासाहेब सहभागी झाले होते. संघाच्‍या विरोधात अनेक जण टीकाटिपणी करतात, परंतु विरोधकांनी संघाला जवळून पाहावे. तरच संघ काय आहे कळेल. देशातील नदया, गोमाता रक्षण, भूमी, निसर्ग, मातृशक्‍ती, नदयांचे संरक्षण करणे, गोमातेची हत्‍या थांबविणे, रासायनिक खते वापरणे बंद करुन भूमीचे रक्षण करणे, भूजल वाढवून निसर्गाचा समतोल राखणे काळाची गरज झाली आहे. आजची स्‍त्री घरातून बाहेर पडली तर पुन्‍हा घरी सुखरुप येईल, याची शाश्‍वती नसते. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. त्‍यामुळे मातृशक्‍तीचे रक्षण करणे गरजेचे आहे. 

यावेळी राजश्री कदम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जगदिश कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष या नात्याने उपस्थितांशी संवाद साधतांना शिर्डी संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे म्हणाले. कदम परिवाराचा राजकीय पिंड नाही. तर सेवा व सामाजिक क्षेत्रातला त्‍यांचा पिंड आहे. सेवा व काम यातील फरक कळण्‍यासाठी मी नेहमीच प्रयत्‍न करीत असतो. पाणी, तीर्थ, अन्‍न, प्रसाद, गाणे, आरती, या गोष्‍टीमध्‍ये भक्‍ती ओतली तर पाण्‍याची तीर्थ होते, अन्‍नाचा प्रसाद होतो, गाण्‍याची आरती होते. या कार्यक्रमातून मला प्रेरणा मिळाली. विर्दभात आपल्‍याप्रमाणेच काम करण्‍याची इच्‍छा आहे. यावेळी जगदिश कदम पाटील, नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम पाटील, उपनगराध्‍यक्ष प्रकाश संसारे, सोपानराव शेटे यांनी प्रमुख पाहुण्‍यांचा सत्‍कार केला. 

यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, हभप. उध्‍दव महाराज, शिवाजीराव गाडे, सत्‍यवान पवार, सुरसिंग पवार, देवळाली आदींसह जिल्‍हयातील संघाचे ज्येष्‍ठ कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे जिल्‍हयातील कार्यकर्ते, राजश्री कदम प्रतिष्‍ठानचे, सत्‍यजित कदम पाटील मित्रमंडळ, देवळाली प्रवरा नगरपालिका व देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सोसायटी संचालक, नगरसेवक व कामगार आदिनी केले. सूत्रसंचालन सतिष मुळे यांनी केले. देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमन शहाजी कदम यांनी आभार मानले.