Breaking News

कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पूर्ववत विखेंच्या पाठपुराव्याला यश



शिर्डी प्रतिनिधी 

राज्यातील कृषि विद्यापीठांमधील बंद झालेला कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे.

प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार न करता हा अभ्यासक्रम बंद केला होता. एकिकडे सरकार कौशल्य विकासाचे ढोल बडवत असताना दुसरीकडे शेतीशी निगडीत हा अभ्यासक्रम बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहावे लागणार होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विखे यांनी तातडीने तत्कालीन कृषीमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांच्याशी संपर्क साधून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे होणारे प्रतिकूल परिणाम निदर्शनास आणून दिल्यानंतर फुंडकर यांनी हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले.

त्यानंतर कृषि विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे राधाकृष्ण विखे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. दरम्यान, ‘असोसिएशन ऑफ अॅग्री अॅंड अॅग्रो अलाईड कॉलेजेस’ या संघटनेनेही मुंबई येथे कृषीमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयामुळे ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. अखेर महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांमधील हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याच्या निर्णयावर मोहर लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.