लूडो गेमच्या माध्यमातून खेळला जातोय जूगार तरूणाईस लागतेय चटक
जवळा / प्रतिनिधी
मोबाईल मधील लूडो गेम आजमितीस तरुणांसाठी मनोरंजन किंवा टाईमपास राहिलेले नसून, तो जुगाराचा घातक अड्डा होत आहे. या गेमच्या नावावर चक्क मोबाईलवर जुगार खेळला जातो आहे, लुडो नावाच्या ऑनलाइन जुगाराने तरुणाईला चटक लावली आहे. जिथे जागा मिळेल, तिथे बसून दहा रुपयांपासून हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जुगारावर लावली जात आहे. यावर पोलिस प्रशासनामार्फत काही प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल का, याबद्दल पालक व सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चा आहे.
मोबाईल क्रांतीमुळे जग मुठीत आले आहे. या क्रांतीचा सदुपयोगासोबतच दुरुपयोगही वाढत असून, चक्क मोबाईलवर जुगारही खेळला जात आहे. जुगाराच्या अड्ड्यापासून ते गल्लीबोळापर्यंत ‘लुडो किंग’ या नवीन गेमचे एकप्रकारे अनेकांना व्यसनच लागले असून, चक्क पैशांवर हा जुगार खेळला जात आहे. लुडो किंग गेम खेळण्यासाठी जास्त काही साधनांची आवश्यकता नाही. यासाठी गरज असते केवळ एका अँड्रॉइड फोनची. त्यामध्ये लुडो किंग हा गेम डाऊनलोड करून हा गेम खेळू शकतात. हा जुगार पानटपरी, ओट्यावर, गल्लीबोळात तसेच जूगार अड्ड्यावरही खेळला जात आहे.
असा खेळतात जुगार... लुडो किंग हा जुगार दोन ते चार जणांत राउंड पद्धतीने पैशांवर खेळला जातो. ज्या व्यक्तींच्या चार कवड्या सर्वांत लवकर निश्चित केलेल्या घरात जातील तो विजेता ठरतो. यात पहिल्या विजेत्याला जुगाराची ती रक्कम दिली जाते. दहा ते एक हजार रुपयांपर्यंत जुगार खेळला जातो.
हे आहेत दुष्परिणाम लुडो किंग हा मोबाईल गेम जुगारच असून, तो तरुणाईसाठी घातक ठरू शकतो. अनेकजण पैशांवर जुगार खेळत असल्याने अनेकांना आर्थिक झळ बसत आहे. यातूनच आपसांत वादविवाद होत असून, तरुणाई दिवसातील अनेक तास वाया घालविताना दिसत आहे.
दारू, तंबाखू, सिगारेटप्रमाणेच गेमचे व्यसन जडलं की ते सहजासहजी सुटत नाही. सतत गेम खेळण्यामुळे मुलांच्या मेंदूत बदल होतात. त्यामुळे मुलांचे इतर गोष्टींवर, अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. यावर तरूणांचा अमूल्य वेळ वाया जात असून हे तरुण लूडोमुळे मानसिक रोगी झाल्यासारखे वागत आहेत. त्यांना पालकांनी सांगितलेली कामे किंवा कोणतीही जवाबदारी कळत नाही. पालकवर्गातून या तरूणांचा वेळ खाणार्या व्यसनाधीन करणार्या लूडो गेमबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र ही गेम बंद करण्यासाठी कोठे तक्रार करावी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
