Breaking News

भय्यूजी महाराजांची गोळी झाडून आत्महत्या

इंदूर/वृत्तसंस्था : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून मंगळवारी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली. गोळी झाडल्यानंतर त्यांना येथील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात त्यांचा सक्रीय सहभाग होता. कर्मभूमी महाराट्र असल्याने त्यांचे राज्यात कायम जाणे-येणे सुरु होते. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. गेल्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांतील त्यांच्या समर्थकांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, भय्यूजी महाराज यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत असून यासाठी कुणाला जबाबदार धरु नका, असे त्यांनी यात म्हटले आहे. भय्यूजी महाराजांना नुकतेच राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. परंतु त्यांनी ते नाकारले होते. विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.

इंदूर येथील सिल्वर स्प्रिंगस्थित निवासस्थानी डोक्याच्या उजव्या भागावर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांची एसएफएल टीम घटनास्थळी दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक कारणातून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 50 वर्षीय भय्यूजी महाराज यांचे मूळ नाव उदयसिंग देशमुख असून त्यांचा जन्म 29 एप्रिल 1968 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी झाला होता. सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात गेली 17 वर्षाहून अधिक काळ ते सक्रिय होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सामाजिक जीवनातून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. देशातल्या मोठ्या राजकीय नेत्यांचे ते गुरू राहिलेले आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे ते राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.
चौकट.........
तणावामुळे आयुष्य संपवत असल्याचे स्पष्ट
आयुष्यातील ताणतणावाला मी पुरता कंटाळलोय. आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही. माझ्या मृत्युसाठी कुणाला जबाबदार ठरवू नये, असे भय्युजी महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. सुसाईड नोट लिहिल्यावर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. इंग्रजी भाषेत त्यांनी एका पानाची सुसाईड नोट लिहिली आहे. भय्यूजी महाराजांना गोळी लागल्याची बातमी कळताच मोठ्या प्रमाणात त्यांचे अनुयायी रुग्णालय परिसरात गोळा झाले.