Breaking News

देशातील मुक्त विद्यापीठांनी नव्या वाटा शोधाव्यात - प्रा. डॉ. ताकवले

देशभरातील पारंपारिक विद्यापिठांनाही आता दूरस्थ शिक्षण पद्धतीची परवानगी मिळाल्यामुळे देशभरातील मुक्त विद्यापीठांपुढे स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतु त्यामुळे दूरस्थ शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांनी डगमगून न जाता शिक्षण क्षेत्रातील नवनव्या वाटा धुंडाळाव्यात व आपली आगेकूच कायम ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ शिक्षण तज्ञ तथा नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. राम ताकवले यांनी ‘नॅक’च्या निकषांबाबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विविध विद्यापीठांचे कुलगुरू व प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत केले. ‘राष्ट्रीय मुल्यांकन व प्रमाणन परिषद’ अर्थात ‘नॅक’च्या मुक्त विद्यापीठे तसेच मुक्त शिक्षणप्रणालीशी संबंधित संस्था यांच्या संदर्भातील नवीन निकषांविषयी देशभरातील मुक्त विद्यापीठांचे पाच कुलगुरू, दोन माजी कुलगुरू व विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी यांची दोन दिवसांची परिषद येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संपन्न झाली. ‘नॅशनल टास्क फोर्स’ (NTF) अंतर्गत त्यात ‘नॅक’ने निर्धारित केलेल्या एकूण सातपैकी तिसरा निकष असलेल्या ‘रिसर्च, इनोवेशन ॲन्ड एक्सटेन्शन’ याविषयी सविस्तर उहापोह करण्यात येवून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात आल्या. मुक्त विद्यापीठातील ‘यश इन’ सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात रोज नवनवे तंत्रज्ञान अवतरत आहे. त्यामुळे काहींच्या रोजगारावर देखील गदा येत आहे. मात्र हे तंत्रज्ञान आपले साध्य नसून साधन आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार कसे निर्माण होतील यावरही भर दिला गेला पाहिजे. मुक्त शिक्षण प्रणालीतील संस्थांनी आपल्यावरील टीकेला नेहमी प्रगतीचा मार्ग म्हणून बघावे. दुर्गम - ग्रामीण भागात विखुरलेल्या अनेक ‘एकलव्यांना’ मुक्त विद्यापीठाने आवश्यक त्या शिक्षणसंधी उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहनही प्रा. ताकवले यांनी केले. या परिषदेच्या प्रथम सत्रात दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रा. डॉ. नारायण प्रसाद यांनी ‘रिसोर्स मोबिलायजेशन फॉर रिसर्च’ याविषयी मार्गदर्शन केले. समोरच्या व्यक्तीला प्रभावित करेल इतकी तुमच्या संशोधन विषयाची ताकद व उपयुक्तता हवी असे त्यांनी प्रतिपादित केले. मुक्त विद्यापीठांनी संगणक प्रयोगशाळा, नामांकित शैक्षणिक पुस्तके व मासिकांचे संदर्भ ग्रंथालये, संशोधनासाठी पोषक वातावरण, विद्यापीठाचे स्वत:चे त्यासंबंधी नियतकालिक प्रकाशन, त्या त्या विषयातले तज्ञ मंडळींचा भरणा, नामांकित नियतकालिकांमध्ये विद्यापीठातील संशोधन लेखांची प्रसिद्धी, वैयक्तिक वा स्वतंत्र वा संयुक्तिक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग यावर अधिकाधिक भर द्यावा असेही ते म्हणाले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रा. डॉ. मनोज कुलश्रेष्ठ यांनी ‘इनोव्हेशन इकोसिस्टम’ याविषयी मार्गदर्शन केले. त्यात प्रत्येक विद्यापीठाने आपल्या आवारात ‘इनोव्हेशन क्लब’ स्थापन करणे, विद्यापीठाने आपल्या अखत्यारीत संशोधकास उचित पारितोषिक देणे, संशोधनाविषयीचा ब्लॉग सुरु करणे, संबंधित वृत्तान्त प्रसिद्ध करणे आदी मुद्द्यांवर त्यांनी जोर दिला. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मध्य प्रदेशातील रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजन वेळूकर यांनी विद्यापीठांनी केवळ एम. फिल. व पीएच. डी. या पुरताच संशोधनाविषयी मर्यादित न राहता जगाच्या पातळीवर संशोधन क्षेत्रात जे काही घडत आहे आहे, त्याची दाखल घेवून त्यानुसार आपली कार्यप्रणाली निश्चित करावी असे आवाहन केले. शिवाय ‘नॅक’ किंवा ‘युजीसी’ ची फारशी भीती न बाळगता मुक्त शिक्षण संस्था जे आधीपासून उत्तम काम करत आहे ते त्यांच्या चौकटीत मांडून सादर करावे. तसेच ‘नॅक’ किंवा ‘युजीसी’ यांनी पारंपारिक विद्यापीठांचा निकष मुक्त विद्यापीठे व संस्था यांना न लावता त्यांच्यासाठी स्वतंत्र निकष प्रणाली असावी अशी गरज व्यक्त केली. ओरिसा मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. श्रीकांत महापात्रा यांनी ‘नॅक’च्या सात निकषांची थोडक्यात माहिती देवून त्यातील तिसऱ्या निकषाविषयी मुद्देसूद चर्चा घडवून आणली. तसेच उपस्थितांनी सुचवलेल्या व त्यात करावयाच्या सुधारणांची देखील नोंद केली. मध्यप्रदेश मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कान्हेरे यांनी शिक्षण प्रणालीत मातृभाषा व स्थानिक भाषेवर अधिक जोर द्यायला हवा असे प्रतिपादन केले. परदेशातील शिक्षण प्रतिमान येथे जसेच्या तसे यशस्वी होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्थानिकांशी जोडले जात नाही तोपर्यंत कुठल्याही नवीन शैक्षणिक प्रतिमानचा उपयोग नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘नॅशनल टास्क फोर्स’चे अध्यक्ष व उत्तराखंड मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. नागेश्वर राव यांनी अशा प्रकारच्या परिषदेतून शिक्षण क्षेत्रावर, त्यातील ध्येय धोरणांवर सखोल चिंतन होत असल्याने त्यातून डोळे उघडणाऱ्या गोष्टी समोर येतात. परिणामी संबंधितांचा शिक्षण क्षेत्राविषयीचा दृष्टीकोन बदलून योग्य ती ध्येय – धोरणे लागू होतात, ही समाधानाची बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याशिवाय व विद्यापीठांच्या गुणवत्तेशिवाय आजच्या मुक्त विद्यापीठांनी एवढी मजल मारली नसती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच मुक्त विद्यापीठाने ‘नॅक’च्या नवीन निकषांविषयी परिषद आयोजित करण्याविषयी कुठलेही आढेवेढे न घेता पुढाकार घेतला व देशातील शिक्षण तज्ञांना येथे एकत्रित केले याविषयी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. ‘नॅक’ चे डॉ. बी. एस. पोन्मुदिराज यांनी कुठले विद्यापीठ किती जुने वा किती गौरवशाली परंपरेचे आहे यावर नॅकचा भर नसून त्या त्या विद्यापीठांनी गेल्या पाच वर्षात काय कामगिरी केली यावर असल्याचे सांगितले. विद्यार्थी संबंधीत विद्यापीठावर किती समाधानी आहेत, त्या विद्यापीठांचे शैक्षणिक सेवा – सुविधा पुरविण्याबरोबरच संशोधन करण्यात वा पेटंट मिळविण्यात किती योगदान आहे आहे याचाही विचार केला जात असल्याचे सांगितले. परिषद फलदायी ठरेल : कुलगुरू प्रा. वायुनंदन देशातील ‘राष्ट्रीय मुल्यांकन व प्रमाणन परिषद’ अर्थात ‘नॅक’च्या नवीन निकषांविषयी देशपातळीवरील शैक्षणिक क्षेत्रात विचारमंथन सुरु आहे. ‘नॅक’ च्या सातपैकी तिसरा निकष असलेल्या ‘रिसर्च, इनोवेशन ॲन्ड एक्सटेन्शन’ याविषयी सदर परिषद यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती. त्यात दोन दिवस सांगोपांग चर्चा होवून सदर तिसऱ्या निकषमध्ये आवश्यक व ठोस अशा सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. भारतासारख्या विशाल खंडप्राय देशाची आगामी शैक्षणिक धोरणे व वाटचाल ठरविण्याच्या दृष्टीने मुक्त विद्यापीठात झालेली ही परिषद निश्चितच फलदायी ठरेल.