Breaking News

मोहा गाव कलाकेंद्र मुक्त करण्यासाठी ठराव मंजूर कलाकेंद्र चालकांचे धाबे दणाणले

जामखेड /ता. प्रतिनिधी । तालुक्यातील मोहा गावाच्या हद्दीतील कला केंद्रामुळे अवैध धंदे वाढले आसल्याने, ती कलाकेंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी आज घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोहा गाव कलाकेंद्रमुक्त करण्यात यावे यासाठी हातवर करून पाठींबा दिला. यामुळे कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

आठ दिवसांपुर्वीच शनिवार दि. 26 मे रोजी घेण्यात आलेल्या, ग्रामसभेत नविन कला केंद्रांच्या परवानगीमुळे चांगलाच गदारोळ झाला होता. त्यामुळे कसलाही तोडगा निघाला नाही. परीणामी पुन्हा मोहा येथील ग्रामसभा ही दि. 2 जून रोजी घेण्याचे ठरले होते. त्या अनुशंगाने मोहा ग्रामपंचायतीसमोर बेकायदेशीर कलाकेंद्रांच्या मुद्यावर ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी बी.के माने, मंडळ अधिकारी गोपाळराव मोहळकर, ग्रामसेवक पी.एस बुद्धीवंत, तलाठी जितेंद्र गाढवे, सरपंच सारीका डोंगरे, महादेव बांगर, शिवाजी डोंंगरे, उत्तम गायकवाड, सुरेश देडे, शहाजी इंगळे, तुकाराम डोंगरे, बाबासाहेब बांगर, संग्राम घुमरे, अप्पासाहेब बांगर, वामन डोंगरे, रणजित चौधरी, अविनाश रोडेसह मोहा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. 
ग्रामस्थांनी मोहा परीसरात असलेल्या पाच कलाकेंद्रामुळे परीसरात अवैध धंदे वाढले असल्याचे सांगत, ग्रामस्थ सोमनाथ डोंगरे यांनी सांगितले की, 2017 च्या ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये देखील कलाकेंद्र बंद करण्यासाठी ठराव झाला मात्र, अद्यापही हे कलाकेंद्र बंद झाली नाहीत, तसेच कलाकेंद्र ही अनाधिकृत असुन हॉटेलच्या नावाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. रणजित चौधरी यांनी अधिकार्‍यांबरोबर दोषी पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. ग्रामस्थ सतिश शिंदे म्हणाले की, नविन संगीत बारीला परवानगी दिली कशी? तसेच नविन संगीत बारी माझ्या शेताच्या जवळ होणार आहे. आम्ही बाहेरगावी नोकरीला असल्याने या कलाकेंद्रामुळे आमच्या कुटुंबियांना धोका निर्माण होऊ शकतो. मोहा गावचे ग्रामपंचायत सदस्य भिमराव कापसे यांनी पाचही कलाकेंद्र बंद करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असे सांगितले. सोमनाथ डोंगरे यांनी मोहा गाव कलाकेंद्र मुक्त करा अशी मागणी केली. यानंतर पाचही कलाकेंद्र बंद करण्यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव पारीत केला. या वेळी ग्रामसेविका पी.एस बुधवंत, तसेच ग्रामविस्तार अधिकारी बी.के माने यांनी सांगितले की, ग्रामसभेत घेण्यात आलेल्या सर्व कलाकेंद्र बंद करण्याचा ठराव वरीष्ठांना पाठवण्यात येईल.