Breaking News

निर्जन ठिकाणी कार थांबल्याचा फायदा घेत इसमांनी केला आई व मुलाचा खून


पुणे - निर्जन ठिकाणी कार थांबल्याचा फायदा घेत दोन अनोळखी इसमांनी आई आणि मुलाचा खून केला. तर पतीवर वार करून कारमधील रोख रक्कम, सोन्याची चेन आणि मंगळसूत्र चोरून नेले. जांबे-नेरे रस्त्यावर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अश्‍विनी भोंडवे (25) आणि अनुे (8 महिने) अशी खून झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. तर दत्ता भोंडवे असे जखमी झालेल्या फिर्यादी पतीचे नाव आहे. चिंचवडमधील डांगे चौकात दत्ता भोंडवे आपल्या पत्नी आणि मुलासह सासरी आले होते. दिवसभर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होत होता. त्यामुळे ते किरकोळ औषधोपचार करून घरी निघाले. जांबे गावच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्ती जवळ गाडी वळली असता दत्ता यांना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी कार बाजूला घेतली. उलटी झाल्यानंतर चूळ भरत असताना अनोळखी दोन इसम जबरदस्तीने कारमध्ये बसले. त्यांनी अश्‍विनीच्या तों डावर रुमाल टाकून तिचे तोंड दाबले. त्यामुळे श्‍वास कोंडी होऊन तिचा जागेवर मृत्यू झाला. 8 महिन्यांच्या अनुजला देखील अमानुषपणे मारण्यात आले. दरम्यान दत्ता यांच्या मानेवर चाकू ठेऊन दोघांनी कारमध्ये असलेले रोख 50 हजार रुपये, दत्ता यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, अश्‍विनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दोन मोबाईल फोन घेऊन दत्ता यांच्यावर वार करून पळून गेले.