वाळू ठेक्याच्या मॅनेजरला दमदाटी आणि मारहाण
राहुरी विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील जातप येथील प्रवरानदीपात्रात शासकीय परवानगीने वाळू लिलाव सुरू असताना याठिकाणी अचानकपणे १० ते १२ जणांनी वाळू ठेक्यातील मॅनेजरला दमदाटी केली. या लोकांनी वाहनाची तोडफोड करत मारहाण केल्याची घटना घडली. आमच्या हद्दीत वाळू उपसा केला तर जिवंत जाळून टाकू, अशी धमकी देत दोघांना बेदम मारहाण केली.
याप्रकरणी जातप वाळू ठेक्यातील मॅनेजर अमोल राजू माने {रा. नागापूर, एमआयडीसी, नगर} यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी दादा खरात, सोनू खरात, भावड्या खरात, हनुमंत खरात, अमोल खरात {सर्व रा. कान्हेगाव ता. श्रीरामपूर} यांच्यासह अन्य ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यशासनाने अनेक ठिकाणी वाळू उपशाचा लिलाव करत वाळू उचलण्याचा ठेका दिला. मात्र राहुरी सध्या तालुक्यात अनधिकृत वाळूउपशाकडे नागरिक व ग्रामस्थ दुर्लक्ष करुन अधिकृत असलेल्या वाळू लिलावाकडे आंदोलन व कारवाई करण्याचा हट्ट धरत असल्याने लिलावधारकही हातबल झाले.