सासरच्या दारातच पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
या घटनेमुळे सदर परिसरात काही काळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाता आली. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मारुती बारहाते यांच्या संगिता नावाच्या मुलीचा विवाह राहुरी तालुक्यातील देवळाली इरिगेशन बंगला येथील महेश सिनारे याच्याशी दि. ११ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला होता. या चार महिन्यांच्या कालावधीत सदर तरुणीला पतीकडून रोज दारु पिऊन मारहाण होत असल्याची तक्रार मलीने नातेवाईकांकडे काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येऊन चर्चा करुन मुलाने मी दारु पिणार नाही, तिला त्रास देणार नाही, असे म्हणत माफी मागितली होती. त्यानंतर मुलीच्या माहेरच्यांनी तिला सासरी पाठविले होते. तीन दिवसांपूर्वी उलटी, मळमळ आणि डोके दुखत असल्याकारणाने तिला सासरकडच्या लोकांनी देवळाली येथील एका खाजगी डाॅक्टरकडे नेले होते. सदर डाॅक्टरांनी बरे न वाटल्यास मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सांगितले. मात्र सासरच्या लोकांनी तिला उशिरा दवाखान्यात नेले, असा आरोप सदर विवाहितेच्या नातेवाईकांनी केला. विशेष म्हणजे तिचे शिक्षण एमफीलपर्यंत झाले असून ती सध्या पीएचडी करत होती. दरम्यान, पोलिसांनी संगिता महेश सिनारे हिच्या मृत्यूप्रकरणी मृत्यु प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली.