Breaking News

तहसीलदारांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक; अतिक्रमण काढण्यास सोमवारपासून सुरूवात


कोल्हार / प्रतिनिधी 
येथील ओढे, चर व नाले यावर झालेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढणे, पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता मार्ग मोकळा करून वहिवाटीचा अडथळा दूर करणे आदी विषयांवर राहाता तहसीलदारांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. सदर कामास सोमवारी प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कोल्हारमधील बुजलेले ओढे, नाले व चर मोकळा श्‍वास घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्या कार्यालयात काल तहसीलदार माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार राहुल कोताडे, लोणीचे स.पो.नि. रणजित गलांडे, कनिष्ठ अभियंता रवींद्र चौधरी, कोल्हारचे माजी सरपंच अ‍ॅड सुरेंद्र खर्डे, उपसरपंच स्वप्नील निबे, ग्रा.स. ज्ञानेश्‍वर खर्डे, पंढरी खर्डे तसेच रमेश निबे कोल्हारच्या तलाठी सुरेखा अबुज, भगवतीपुरच्या तलाठी पी.एन वाडेकर, ग्रामसेवक एस. ए. चौरे व विविध खात्यामधील अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत कोल्हार-कडीत शिव रस्ता, तिसगांव रोडवरील दोन्ही बाजूच्या साईड गटारी, नगर मनमाड रस्त्यावरील पाण्याच्या टाकी जवळील सीडी वर्क, कुंकूलोळ व्यापारी संकुलात साठणारे पाणी, ड्रेनेज लाईन आदी कामे मार्गी लावण्याचा निर्णय झाला. ओढे, चर व नाले या सोबत यावरील अतिक्रमण काढताना शासकीय कामात कुणी अडथळा निर्माण केल्यास, त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचाचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वरील सर्व काम प्रत्यक्ष सोमवारी सुरु करणार असल्याचे यावेळी अधिकर्‍यांनी सांगतले. सर्व कामाचे व्हिडीओ शूट करून यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अतिक्रमण धारकांना 7 दिवसांची मुदत देण्यात येईल, त्यानंतर संबंधित व्यक्तीने अतिक्रमण न काढल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाईक करून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा इशारा यावेळी तहसीलदार माणिक आहेर दिला. 
यावेळी सुरेंद्र खर्डे यांनी सदर काम करीत असताना येणार्‍या संभाव्यता अडथळ्यांची कल्पना अधिकारी वर्गास दिली. तसेच प्रवरा नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा त्याचसोबत गाढवांचा होणारा उपद्रव याबाबत अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. गाढवांचा व वाळूची चोरटी वाहतूक करनार्‍यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकर्‍यांनी सांगितले. तर गाढव मालकांवर तातडीने कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सदर कामास प्रत्यक्ष सोमवारी परत होणार असल्याचे यावेळी अधिकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हारमधील चार नाले व ओढ्यांवरील अतिक्रमण निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.