शिबिरातून रक्ताची ही तूट भरुन काढणं शक्य : घोलप
।संगमनेर/प्रतिनिधी।
देशात वेगाने महामार्गांची संख्या वाढत आहे. त्यातून वाहनांचीही गती वाढल्याने अपघाताच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे देशात सतत रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. रक्तदानाला जीवनदानाचे महत्व असल्याने आपल्या दानातून कोणाचा तरी जीव वाचणार आहे, या भावनेने अशा शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन होण्याची गरज आहे. रक्तदान शिबिरासारख्या उपक्रमातून रक्ताची ही तूट भरुन काढता येणं शक्य आहे, असे प्रतिपादन रमेश घोलप यांनी केले.
येथील मालपाणी उद्योग समूह सामाजिक जाणीवेतून गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवित आहे. अर्पण रक्तपेढीच्या सहयोगाने मालपाणी उद्योग समुहाच्या मालपाणी इस्टेट विभागात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी घोलप बोलत होते. यावेळी देवदत्त सोमवंशी, अर्पण रक्तपेढीच्या अधिकारी डॉ. मधुरा पाठक, डॉ. शैलेश तोरकडी, प्रमिला कडलग, रविंद्र कानडे आदी उपस्थित होते.
उद्योग समुहाचे संस्थापक स्व. दामोदर मालपाणी यांच्या ४३ व्या स्मृतीदिनानिमित्त झालेल्या या शिबिराला कामगार व कर्मचार्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरातून ८२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. प्रारंभी सोमवंशी यांनी प्रास्तविक केले. यात त्यांनी मालपाणी उद्योग समुहात दरवर्षी दि. १७ जून रोजी होणार्या रक्तदान शिबिराचा धावता आलेख मांडला. सकाळी १० वाजता सुरु झालेले शिबीर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु होते. रक्तदात्यांना अर्पण ब्लड बँकेच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर यशस्वी केल्याबद्दल अर्पणच्यावतीने मालपाणी उद्योग समुहाला मानचिन्ह देण्यात आले. यावेळी मालपाणी उद्योग समुहातील अधिकारी, आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्चना शुक्ला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
