Breaking News

सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्ला


आश्वी : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे सलग दुसऱ्या दिवशीदेखील बिबट्याने दोन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. येथे बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दोन घटना घडूनही वनविभागाकडून साधी दखलही घेतली जात नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

गुरुवारी रात्री १०.४५ च्या सुमारास उंबरी-बाळापूर शिवारातील पाधी रस्त्यालगत झालेल्या बिबट्याच्या हल्यात विद्युत पंप सुरु करण्यासाठी जात असलेले विठ्ठल सोन्याबापु उंबरकर हे जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले महेश सांबरे (गुरु) हे थोडक्यात बचावले आहेत. येथील नागरिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आले होते. त्यांच्या डाव्या पायाला बिबट्याने पंजा मारल्याने जबर दुखापत झाली. दुसऱ्या एका घटनेत आदल्या दिवशी (बुधवारी) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सुनिल गाडेकर व भाऊराव क्षिरसागर हे दोन तरुण आपल्या दुचाकी गाडीने घराकडे येत होते. आश्वी - उंबरी रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्रालगत बिबट्याने सुनिल गाडेकर या तरुणावर झडप घालून जखमी केले होते. दोघांनीही प्रसंगसावधान दाखवत मोठ्याने आरडा-ओरड करण्यास सुरवात केली. त्यामुळे घाबरलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावत हा बिबट्या जेरबंद करावा आणि नागरिकांची बिबट्याच्या दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.