Breaking News

भरदिवसा धाडसी चोरी ; २ लाख ४० हजार लांबविले


कोपरगाव शहर प्रतिनिधी 
कोपरगाव जुन्या गावठाण भागातील श्रीराम ट्रेडिंगचे मालक जयेश जयनारायण डागा यांच्या दुकानातून दुपारी चार वाजता दोन अज्ञात इसमांनी दुकानाच्या काऊंटरमधील २ लाख ४० हजारांची रोकड लांबविली. या इसमांनी पार्ले बिस्किटचे कार्टून द्या, असे सांगितले. दुकानदार यांना आत गेल्याचे पाहून या भामट्यांनी रोख लांबविली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भुरट्या चोरांचा हल्ली येथे प्रचंड सुळसुळाट झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पालिका कर्मचारी गालत यांच्या घरात ६० हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. दुचाकी अडवून रोख रक्कम लंपास केली. त्यातच भरदिवसा आज भारत प्रेस रोडवर असलेल्या डागा यांच्या किराणा दुकानातून एका इसमाने बिस्कीट मागण्याच्या बहाण्याने दुकानच्या काऊंटरच्या खालील कपाटातून २ लाख ४० हजार रुपयांची पिशवी हातोहात लांबविली. याप्रकरणी जयेश डागा यांनी दिलेल्या फिर्यादीननुसार गुन्हा नोंदविण्यात आला.