Breaking News

पिंपरी-चिंचवड शहरातही पे अ‍ॅण्ड पार्क धोरण रद्द करावे

पुणे, दि. 27, जून - पिंपरी-चिंचवड शहरातही पे अ‍ॅण्ड पार्क असणार आहे. याबाबतच्या धोरणाला महासभेने मंजुरी दिली. दरम्यान, पार्किंग पॉलिसीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे अशा सर्व पक्षांनी विरोध नोंदविला होता. परंतु, त्यांचा विरोध नोंदवून महासभेने या धोरणाला मान्यता दिली. परंतु हे धोरण नागरिकांच्या हिताचे नसल्याचे सांगत महापालिकेने हे धोरण रद्द करावे, अशी मागणी ग्राहक हक्क संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड ग्राहक सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड हे शहर कष्टकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे शहर आहे. महागाई वाढत आहे. पेट्रोलच्या चढ्या भावाने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने पे अ‍ॅण्ड पार्क धोरण निश्‍चित केले आहे. या धोरणानुसार सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत प्रत्येक वाहनासाठी नागरिकांना 25 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी वर्षाकाठी तब्बल 9 हजार 125 रुपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम शहरातील घरपट्टीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे एवढे पैसे भरणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत हे धोरण रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.