शासनाकडूनच जातीयवादाला मिळतेय खतपाणी; स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा आरोप
कोपरगाव शहर प्रतिनिधी :
जळगांव जिल्ह्यातील वाकडी तालुक्यातील जामनेर येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या सचिन चांदणे आणि राहुल चांदणे या मातंग समाजातील तरुणांना नग्न करून बेदम मार दिल्याच्या घटनेचा अद्यापही सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर ‘अपलोड’ करून ज्यांनी जातीय तेढ निर्माण केली, त्या जातीयवाद्यांना शासन पाठीशी घालत असून या माध्यमातून शासन जातीवादाला खतपाणी घालत आहे, असा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.
तहसीलदार किशोर कदम यांना सदर निवेदन नुकतेच देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे. ऍस्ट्रोसिटी कायदा शिथिल केल्यामुळे जातीयवादी व्यवस्था फोफावत आहे. त्यामुळे अशा घटना वारंवार होत आहेत. या जातीयवादी व्यवस्थेवर वेळीच योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर नितीन शिंदे, रविंद्र जगताप, गणेश पवार, नानासाहेब मोरे, अनिल वेरावळ, योगेश शिंदे, सुरज दुशिंग, पप्पू धामणे, अबूबकर मनियार, अयास शिंदे, विशाल कोपरे, बाळा पवार, सुनील वैरागळ, अविनाश शिंदे, राजेंद्र घोडेराव आदींच्या सह्या आहेत.
