Breaking News

विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी आता ’पीएचडी’ अनिवार्य

नवी दिल्ली - विद्यापीठांमध्ये ’प्राध्यापक’ पदावरील नियुक्तीसाठी ’नेट’ पात्रतेबरोबरच ’पीएचडी’ असणेही अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. वर्ष 2021 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

कॉलेजमधील शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी मात्र, ’नेट’ किंवा ’पीएचडी’ची सध्याची किमान पात्रता कायम राहील. आत्ता ज्यांच्याकडे पीएचडी’ किंवा मास्टर्स पदवीसोबतच नेट पात्रता आहे ते विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापकपदासाठी अर्ज करु शकतात.
उच्च शिक्षणाचा स्तर उंचावण्याच्या उद्देशाने विद्यापीठे आणि कॉलेजांतील शिक्षकांच्या नियुक्त्या व बढत्यांसाठी किमान पात्रतेचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) नवे नियम बुधवारी जाहीर करण्यात आले. 2021 पासून विद्यापिठातील शिक्षकांसाठी पीएचडी अनिवार्य असेल. आम्ही 3 वर्षांचा काळ दिला आहे, असे जावडेकर म्हणाले.
विद्यापीठातील शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी संशोधन हा आधार असेल. मात्र, कॉलेजमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यावरच लक्ष केंद्रीत करणे शक्य व्हावे यासाठी त्यांच्या पदोन्नतीसाठी संशोधनाची अट काढून टाकण्यात आली आहे. तसेच विदेशातील 500 अव्वल विद्यापीठांतून पीएचडी करणारे भारतीय देखील या पदासाठी पात्र ठरणार आहेत. सध्या अशा पीएचडीधारकांना भारतात शिकवता येत नाही.