Breaking News

दूध विक्री दरात 4 रुपयांनी कपात, उत्पादक संघटनांचा निर्णय

पुणे - राज्यातील 16 खासगी दूध उत्पादक संघांनी गायीच्या दूध विक्री दरात 4 रुपये प्रति लिटर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 16 खासगी दूध उत्पादक संघांनी 11 जूनला बारामतीमध्ये बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या 16 जूनपासून या दूध दर कपातीची अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून दूध खरेदी दरात घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरला मागणी नाही. त्यामुळे याठिकाणी दर मिळत नाही तोपर्यंत आम्ही कितीही प्रयत्न केला तरी दूध पॅकिंगच्या व्यवसायात शेतकर्‍यांना खरेदी दर वाढवून देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती उत्पादकांनी दिली आहे.
शेतकर्‍यांची आंदोलन, सरकारची भूमिका पटत असली तरी खरेदी दर वाढवता येत नाही. दुसरीकडे दूध उत्पादनामध्ये वाढ होत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळी कारणे सांगून गायीच्या दुधाची खरेदी केली जात नाही, असे ही दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन खासगी दूध उत्पादकांनी बैठक घेत दुधाचे दर ग्राहकांसाठी कमी केले आहेत. जेणे करून शेतकर्‍याच्या गायीच्या दुधाला नाही न म्हणता हा फायदा ग्राहकांना देऊन दूध विक्री वाढवण्याचा प्रयत्न आहे.
राज्यातल्या या 16 खासगी उत्पादकांकडून दररोज 10 लाख पॅकिंग दूध विकले जाते. त्यामुळे ग्राहकांना निश्‍चित याचा फायदा होईल आणि पर्यायाने मागणी नसलेल्या शेतकर्‍यांच्या गायीच्या दुधाला उठाव मिळेल अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. यामध्ये सहभागी असलेल्या 16 खासगी दूध उत्पादकात सोनाई, ऊर्जा, थोटे, गोविंद, स्वराज, किसान, संतकृपा, नेचर, स्वयंभू, शांताई, अनंत, शिवप्रसाद, माऊली दूध, नॅचरल, कन्हैया आणि गोशक्ती या दूध संघाचा समावेश आहे.