Breaking News

अग्रलेख - पगडी रसम....!


राष्ट्रवादीची द्विदशकपुर्ती आणि हल्लाबोल आंदोलनाची सांगता असा दुहेरी योग साधून जाणत्या राजाने पगाडी रसमचा दुग्ध शर्करा यज्ञ उरकू घेतला. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांच्या देहबोलीकडे,वाणीकडे राज्यभरातील राजकारणाचे लक्ष लागले होते.नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन शरद पवार यांनी भुजबळांना फुल्यांची पगडी घालून धुर्तपणाचा आणखी एक दाखला दिला. बंदर कितना भी बुढा हो गया तो गुलाटी मारना नही छोडता या भुजबळांच्या शेरेबाजीला शरद पवारांनी आगदी साजेशी साद घालून अजूनही मुत्सुदेगीरी तारूण्यात असल्याचे दाखवून दिले. पगडी बदल ही शरद पवारांची ही कृती केवळ एक कृती नाही तर शतको न शतके सुरू असलेल्या मनूवादी विरूध्द पुरोगाम्यांमधील सत्यशोधक लढाईचा एक भाग आहे. शरद पवारांनी भुजबळांच्या डोक्यावर फुलेंची पगडी ठेवून या लढाईचे रणशिंग नव्याने फुंकले आहे.
पगडी डोक्यावर ठेवण्याची गोष्ट आहे एव्हढाच मर्यादीत अर्थ या शब्दाला नाही तर ज्या डोक्यावर ती पगडी बासली आहे त्या डोक्यात वळवळणार्‍या किड्यांची जात ही पगडी निर्देशीत करते. आणि म्हणूनच शरद पवार यांनी भुजबळांच्या डोक्याचा वापर करून उरकून घेतलेल्या पगडी रसमचा वेगळा आणि खोल अर्थ आहे. पुणे या शहरात पेशव्याःची आणि फुल्यांची पगडी अशा दोन प्रकारच्या पगड्या दोन वेगळ्या विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करतात. पुणे पेशव्यांची राजधानी. सदाशीव पेठी विचारांचा पगडा आजही या राजधानीच्या कोपर्‍या कोपर्‍यावर दिसतो.त्याला फुलेंच्या विचाराने प्रभावित झालेल्या सत्यशोधक विचारांनी कडाडून विरोध केला.आजही तो कायम आहे. नेमक्या या दोन विचारसरणीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या त्या दोन पगड्या त्या दिवशी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर झालेल्या जाणत्या नाट्याने चर्चेत आल्या आहेत.राष्ट्रवादीचे व्यासपीठ मनूवादी विचारसरणीला थारा देणार नाही हा इशारा शरद पवारांनी या कृतीतून दिला आहे.केवळ एव्हढेच नाही तर शरद पवार यांची भाजपाशी छुपी युती आहे इथपासून भुजबळ राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार भाजपाशी भुजबळांशी जवळीक वाढत आहे अशा प्रकारच्या उठत असलेल्या वावड्यांनाही शरद पवारांनी पगडी रसमच्या कृतीतून चोख उत्तर दिले आहे.पुढील राजकारणाची दिशाही या कृतीतून स्पष्ट केली आहे.सुज्ञास अधिक सांगणे न लगे!