Breaking News

मुंबईत आजपासून स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड


मुंबई : महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येणार आहेत. हा स्टार्ट अप सप्ताह २५ जून ते २९ जूनदरम्यान विवंता बाय ताजहॉटेल,कफ परेड, मुंबई येथे पार पडणार आहे.

महाराष्ट्रातील स्टार्ट अप्सना उभारी देऊन त्यांना हातभार लावण्याचे काम राज्य शासन करणार असून, राज्यातील युवकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जेणेकरून नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकऱ्या उपलब्ध करून देणारे उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती श्री.पाटील-निलंगेकर यांनी दिली.

या सप्ताहांतर्गत नावीन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. स्टार्ट अप अंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्ट अप योजनेत समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत मागविण्यात आलेल्या एकूण २००० स्टार्ट अपची नोंदणी करण्यात आली असून ९०० स्टार्ट अप स्वीकारण्यात आले आहेत. त्यापैकी या सप्ताहात विविध क्षेत्रातील १०० व्यवस्थापन/उद्योजक यांची निवड करण्यात आली असून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निवड समितीमध्ये शासकीय, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि तज्ज्ञ समाविष्ट असणार आहेत.


या संपूर्ण चार दिवसीय सत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातील स्टार्ट अपचे निवड समितीसमोर सादरीकरण करून प्रत्येकी तीनस्टार्ट अपची निवड करण्यात येणार असून एकूण २४ नवीन उद्योजकांची निवड करुन त्यांना १५ लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना (स्टार्ट अप) शासकीय यंत्रणेशी संपर्क व सहयोग पुढील १२ महिन्यासाठी देण्यात येणार आहे.


परदेशात व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वरील २४ स्टार्ट अपमधील ५ ते १० नवीन उद्योजकांना१५ लाखापर्यंत आर्थिक सहाय्य परदेशात बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत करण्यात येईल. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार आहेत. १७ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य स्टार्ट अप धोरण २०१८ जाहीर केले आहे. महाराष्ट्र सरकार आणि स्टार्ट अप करिताची परिसंस्था (इको सिस्टीम) यामधील नाते अधिक सुदृढ व्हावे, हा यामधील महत्त्वाचा उद्देश आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी (MSInS) हे धोरण राबवण्यासाठी असणारी नोडल संस्था म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह हा या प्रकारचा असा उपक्रम पहिल्यांदाच सादर करत आहे.