Breaking News

दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य ठरले ‘महाराष्ट्र’



नवी दिल्ली : देशभरातील राज्यांमध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत दूध उत्पादनात सर्वाधिक प्रगती करणारे राज्य ‘महाराष्ट्र’ ठरले. आज इंडिया टूडेच्या ॲग्रो समीटमध्ये महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


पुसा येथील ए.पी. शिंदे सभागृहात इंडिया टूडे ॲग्रो समीटचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग, इंडिया टूडे समूहाच्या प्रकाशन विभागाचे समूह संपादक राज चेंगप्पा, संपादक अंशुमन तिवारी मंचावर उपस्थित होते. यासह महाराष्ट्राचे मंत्री महादेव जानकर, विविध श्रेणीतील पुरस्कारप्राप्त राज्यांचे मंत्री तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इंडिया टूडेने केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्याने केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्राने सर्वाधिक चांगले कार्य केल्याचे निदर्शनात आले. ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्राने मागील तीन वर्षात सरासरी दूध उत्पादनात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. वर्ष 2013-14 मध्ये राज्यात90.8 लाख मेट्रिक टन दूध उत्पादन व्हायचे तर यात वाढ होऊन वर्ष 2016-17 मध्ये 104 लाख मेट्रिक टन इतके झाले आहे.


महाराष्ट्रात पालघर, पोहरा आणि तथावडे येथे गोकुळ ग्रामांची स्थापना झाली असून इतर गावेही गोकुळ ग्राम करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. देशी वंशाच्या पशुंचे संरक्षण आणि संवर्धन तसेच वेटनरी रूग्णालयामध्ये सर्व पायाभूत व आधूनिक सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.