दखल पवारांचा पगडीबदल आणि त्यावरची टीका
शरद पवार यांना पुरोगामी नेते समजले जात असले, तरी त्यांच्या अनेक कृती कायम वाद निर्माण करणार्या असतात. वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून त्यांनी जेव्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं, त्या सरकारला संघ परिवारातील आमदाराचीही साथ होती. महाराष्ट्रात भाजप वाढण्यास पवारांची ही पहिलीच कृती जबाबदार आहे, असं अजूनही सांगितलं जातं.
महिलांना आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर, उपेक्षितांना वेगवेगळी पदं देऊन त्यांचा सन्मान करणं असे कितीही चांगले निर्णय पवारांनी घेतले असले, तरी वाजपेयी सरकारमध्ये मंत्रिपदाचा दर्जा असलेलं पद स्वीकारणं आणि मोदी यांना काँग्रेसचं सरकार असतानाही मदत करणं तसंच महाराष्ट्रात निवडणुकीनंतर न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा देणं या कृती त्यांच्यावर टीका करण्यास निमंत्रण देणार्याच होत्या. त्यामुळं शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणारे पवार खरे, छगन भुजबळ, लक्ष्मण माने, मधुकर पिचड, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना वेगवेगळी पदं देऊन सन्मान करणारे पवार खरे, की राष्ट्रवादीला मराठा समाजाचा पक्ष बनविणारे पवार खरे, असं न सुटणारं कोडं पवार यांनी कायम आपल्या वागणुकीतून दाखवून दिलं आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर तसंच देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पवार यांची त्यानंतरची प्रतिक्रिया पाहता पवार खरचं पुरोगामी आहेत का, असा सवाल अनेकदा उपस्थित करण्यात आला होता.
पुण्यात आतापर्यंत बर्याचदा झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी स्वतः च पुणेरी पगडी घातली आहे. कोल्हापूरचा फेटा, मंचरची टोपी, पुण्याची पगडी ही त्या त्या भागाची भौगोलिक ओळख जपणारी बाब आहे. ती केवळ प्रतिकं असतात. त्यात एखाद्या जातीचा, धर्माचा तसा संबंध नसतो. एखादं प्रतिकं वर्षानुवर्षे संबंधित शहराची ओळख म्हणून दिलं जात असेल, तर त्याला जातीयतेचं बिरुद चिकटविणं योग्य नाही. बदललेल्या आधुनिक जीवनशैलीत खरं तर फेटे, पगड्यांची गरज संपली आहे. एखादी परंपरा साजरी करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या सण-समारंभापुरतीच आता त्यांची शोभा. पवार राजकीय हिशेब बरोबर ठेवतात. एखादी परंपरा नाकारण्याचा त्यांना जरूर अधिकार आहे. छगन भुजबळ यांच्या राजकीय निष्ठेबाबत शंका घेतली जात होती. मराठा आरक्षणाच्या राष्ट्रवादीच्या आग्रहामुळं इतर मागासवर्गीय समाज मराठा समाजावर नाराज झाला होता. त्याची चुणूक बर्याच निवडणुकांत दिसली होती. अशा वेळी इतर मागासवर्गीय समाजाला आपलंसं करण्याची संधी पवार शोधत होते. भुजबळ सध्या कोणत्याच पक्षात जाण्याची शक्यता नाही. त्याचं कारण निवडणुकीला अजून वेळ आहे. महात्मा फुले हे भुजबळ यांचं दैवत. महाराष्ट्रात माळी समाजाची लोकसंख्या भरपूर. पुणेरी पगडीला फुले यांचा विरोध नव्हता. त्या प्रवृत्तीला होता. या समाजाच्या भावनांना हात घालायचा असेल, तर आता फुले वापरत असलेल्या पगडीचं बँडींग करणं पवार यांना जास्त महत्त्वाचं वाटलं. पुणेरी पगडी आता अल्पसंख्यांकात मोडायला लागली आहे. फुले पगडी बहुसंख्यांकांची ओळख आहे. त्यामुळं भुजबळांच्या डोक्यावर चढवलेली पुणेरी पगडी पवारांना खटकली आणि तातडीनं ती उतरवण्याची सूचना त्यांनी केली. एवढेच नव्हे, तर यापुढच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कोणती पगडी घालायची याचं प्रात्यक्षिकही त्यांनी लगेच करून दाखवलं. एक पारंपारिक प्रतिक मोडून काढताना दुसरं पारंपारिक प्रतिक पुढं करण्याची पवारांची खेळी इतरांना टीका करण्यासाठी आयतं कोलित देऊन गेली, तरी पवार यांना जे साध्य करायचं आहे, ते साध्य झालं आहे.
पवारांचा राग पुणेरी पगडीवर नसावा. 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या पगडी बदल मोहिमेकडं पाहावं लागेल. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात महिला, अल्पसंख्य, इतर मागासवर्गीय, मागासवर्गीय असे चेहरे आवर्जून पहिल्या रांगेत बसवण्याची प्रतीकात्मकता शरद पवार आवर्जून पाळतात. तरीही विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष हा शिक्का राष्ट्रवादीला पुसता आला नाही.
मंडल कमिशनचा धागा पुढे नेत मराठा आरक्षणाला समर्थन देण्याच्या भुजबळांच्या भावनात्मक राजकारणाचा मुद्दा पुढं करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. शेतकरी, मराठा आणि ओबीसींमधले काही घटक हा या राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी जनाधार होता, मात्र 2014 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पवारांपासून दुरावत गेला. भुजबळ आणि त्यांच्या डोक्यावरच्या बदललेल्या पगडीच्या माध्यमातून हा दुरावलेला जनाधार पवार पुन्हा एकवटू इच्छितात, हेच त्यातून ध्वनीत होते. बहुजनांमध्ये गमावलेली विश्वासार्हता कमावण्यासाठी महात्मा फुले यांच्या नावाची पगडी लाभदायी ठरू शकते, असा राजकीय आडाखा पवार बांधत असतील तर त्यात चूक काही नाही. प्रभारी मुख्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आता उद्धव ठाकरे यांनीही पवार यांच्यावर या मुद्द्यावरून टीका केली असली, तरी त्यांनाही मराठा, इतर मागासवर्गीय, धनगर आदी समाज पवार यांच्यामागं एकवटले, तर आपलं काय ही भीती सतावत असावी.
शरद पवारांचं भान सुटलं आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. कोरेगाव भीमा दंगलीनंतर राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. पवार यांनी आता जे एकपगडी राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे, अशा शब्दांत ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.