परजिल्ह्यातील जामखेडला बोगस अॅडमिशन; संस्थाचालक करताहेत शिक्षणाचा बाजार
जामखेड / यासीन शेख ।
राज्यभर गाजलेल्या लातूर पॅटर्नच्या परजिल्ह्यातील, मराठवाडयातील विद्यार्थ्यांना 11 वी 12 वी ला अॅडमिशन दिले जात आहेत. त्यासाठी अव्वाच्या सव्वा अतिरिक्त फी घेऊन जामखेडमधील संस्था चालकांनी आपल्या कॉलेजमार्फत शिक्षणाचा बाजार मांडला आहे, शिक्षणक्षेत्रात हा गंभीर प्रकार जामखेडमध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असून, याकडे शिक्षण अधिकारी जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांचे जामखेडमधील सर्वच कॉलेजमध्ये बोगस अडमिशन दिले जाते. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर अॅडमिशन घ्यावे लागत आहेत, त्याचे शैक्षणिक नूसकान होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित संस्था व कॉलेजवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रा. राहुल आहेर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत गटशिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यात कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थ सहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या काही वर्षांत चांगलीच वाढली असून, या महाविद्यालयांमध्ये राज्यभर गाजलेल्या लातूर पॅटर्नचे हजारो विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, त्यांची बोगस हजेरी संबंधित महाविद्यालये लावत असून, त्यापोटी हजारो रुपये अतिरिक्त उकळले जातात, संबंधित विद्यार्थी लातूर, औरंगाबाद, पुणे येथे खाजगी नीट, जेईई क्लासेस करतात, मात्र मेडिकल प्रवेशासाठी हे विद्यार्थी पुणे विभागाचा फायदा मिळावा म्हणून अॅडमिशन जामखेड तालुक्यात घेतांना अधिक प्रमाणात दिसून येतात.
जामखेडचे नाव शैक्षणिक क्षेत्रात 11 वी 12 वी प्रवेशासाठी कुप्रसिद्ध होत आहे. ही बाब जामखेडच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा लावणारी आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व कॉलेजमधील बोगस विद्यार्थी अॅडमिशन तपासून परजिल्ह्यातील अॅडमिशनला बंदी करावी, तसेच चौकशी करून संबधीत महाविद्यालयांवर व संस्थाचालकांवर कारवाई करावी असे निवेदन राहुल शहाजी आहेर यांनी गटशिक्षण अधिकार्यांना दिले आहे. गटशिक्षणाधिकार्यांच्या नजरेतून तालुक्यात सर्व बाबी व्यवस्थित आहेत. मग हा गंभीर प्रकार कसा होत आहे. गटशिक्षणाधिकारी यावर कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.