Breaking News

वाळू तस्करीमध्ये नेमके हात ओले कोणाचे? सर्रास चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक

अकोले तालुक्यात वाळूतस्करांनी चांगलाच हैदोस घातला आहे.जोरवे, हनुमंतगाव या ठिकाणचे वाळू लिलाव वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने अकोले तालुक्यातील वाळूतस्करांची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे आपला धंदा बंद होऊ नये म्हणून वाळूतस्करांनी आपला मोर्चा शेतातील धड्यांकडे वळविला आहे.काही वाळूतस्कर स्टॉक करून ठेवलेल्या वाळूतून वाळूची चोरटी वाहतूक करीत आहेत. वाळूच्या कमी जास्त भावाच्या वादातून तालुक्यात वाळू तस्करांमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये दोन गट पडले असून हे गट एकमेकांच्या विरोधात कारवाया करीत आहे.

तालुक्यातील आढळा व मुळा खोर्‍यातून सध्या सर्वाधिक वाळूची चोरटी वाहतूक सुरु आहे. या विभागातून उपलब्ध होणार्‍या वाळूची विक्री तब्बल 7 हजार रुपये ब्रासने सुरू आहे. तर चार किंवा पाच ब्रास क्षमतेचा वाळूचा डंपर 22 ते 25 हजार रुपये या अधिक दराने विक्री केला जात आहे. या चढ्या दराने वाळूची विक्री होत असल्याने अकोले तालुक्यातील नागरिकांनी व काही वाळूतस्करांनीच बाहेरून कमी भावात वाळू आणण्याची शक्कल लढविली आहे. पारनेर तालुक्यात वाळूला जास्त बाजारभाव नसल्याने या भागातील वाळू थेट अकोले तालुक्यात दाखल होत आहे. तालुक्यात प्रतिदिन ही बाहेरची वाळू दाखल होत असून काही वेळा तर 5 ते 7 खेपा अकोलेत येतात. पारनेरची वाळू साकुर फाटा मार्गे अकोले तालुक्यात दाखल होते. यानंतर ही वाळू लहीत लिंगदेव या गावांतून तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये पाठविली जाते. ही वाळू पुरवठा करणारे तालुक्यातीलच काही वाळूतस्कर असून एकमेक्कांच्या जिरवाजीरवीसाठी कमी जास्त दराने वाळू तालुक्यात विकण्याचा फंडा सुरु आहे. पारनेरमधून दाखल होणार्‍या या वाळूतस्करीकडे महसूल विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. दिवसाढवळ्या ही वाळू अकोले तालुक्यात येत असून दुपारच्या वेळेत या वाळूच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. वाळूतस्करांच्या या जिरवाजिरविच्या राजकारणात सामान्य नागरिकांना मात्र बुरे दिन आले असल्याचे चित्र दिसत आहे. याखेरीज सिन्नर तालुक्यातील चास शिवारातून ही वाळूची मोठी चोरटी वाहतूक सुरू आहे. सिन्नर व अकोले तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी या चालू असलेल्या वाळूतस्करीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. या वाळू तस्करांना अकोले पोलिसांकडून देखील अभय मिळत आहे. प्रत्येक बिट हवालदाराचा हप्ता वाळूतस्कर वेळेवर पोहच करीत असल्याने पोलीस देखील वाळू चोरीवर गप्प बसले आहेत.

गत आठवड्यात वाळू तस्करांची अनधिकृत धडी संतोष काळे या मजुराच्या अंगावर बेतली. मेहेंदुरी परिसरात काही वाळूतस्कर शेतातून वाळू काढीत असताना संतोष काळे हा निराधार तरुण त्यात संपूर्ण गाडला गेला होता. जेसीबी मशीनच्या सहाय्याने संतोष काळे यास बाहेर काढण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी संगमनेरला हलविण्यात आले आहे. इतकी मोठी घटना घडून देखील महसूल विभाग गप्प आहे. महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा देखील केलेला नाही.