Breaking News

‘अमूल’ला अधिक दूध संकलनासाठी परवानगी देऊ - सदाभाऊ खोत

पुणे - दूध दराच्या मुद्द्यावरून सरकारला अडचणीत आणू पाहणार्‍या शेतकर्‍यांना भडकवणार्‍या सहकारी तसेच खासगी दूध संस्था संघाची गय केली जाणार नाही. त्याच्यावर क ारवाई केली जाईल. राज्यात अमूलला अधिक दूध संकलन करण्याची परवानगी देऊ, असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
आज खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, शेतकरी कुठले बियाणे, खत, किटकनाशके वापरतात? त्याची गुणवत्ता काय आदी गोष्टी कळण्यासाठी शेतावर जाऊन पेरणीचा आढावा घेण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी विभागातील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना दिले आहेत. मान्यता तसेच शिफारस नसलेली बियाणे, किटकनाशके आणि खते विकणार्‍या दुकानदारांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खोत यांनी दिले आहेत. बोगस मालाला आळा घालण्यासाठी तालुका कृषी अधिकारी दुकानांची तपासणी करतील. बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पेरणी हंगामात कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतीत जाऊन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. बोंड अळीच्या पार्श्‍वभूमीवर बीटी बियाण्यांना पर्याय म्हणून देशी वान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगत यंदा राज्यात 152 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. 
काही दूध संघांनी संगनमत करून दुधाचे दर पाडलेले आहेत. खरेदी आणि विक्री किंमतीत मोठी तफावत आहे. शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव न देणार्‍या दूध संघांची गय केली जाणार नाही. त्यांचावर करावाई केली जाईल. तसे न झाल्यास जादा दर देणार्‍या अमूलसारख्या दुध संघांना राज्यात जास्त दूध संकलन करण्याची परवानगी तसेच सुविधा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे खोत यावेळी म्हणाले. शेतकरी संप करणार्‍यांनी चर्चेसाठी पुढे यावे. सरकार त्यांच्या प्रश्‍नाबाबत सकारात्मक आहे, असेही सदाभाऊ म्हणाले.