Breaking News

विद्यार्थी मिळविण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे आधुनिक फंडे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या विद्यार्थ्यांची खंत कोणा?


कर्जत / सुभाष माळवे । 21 ः
नविन शैक्षणिक वर्षास नुकतीच सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळेपासून तर खाजगी शैक्षणिक संस्थानी आधुनिक फंडे वापरत आपला विद्यार्थीवर्ग मिळवला. पालकांनीही आपल्या पाल्यासाठी आणि त्याच्या बौद्धिक विकासासाठी फीची चिंता न करता सामाजिक रचनेच्या आधारे प्रवेश घेतला. मात्र या आधुनिक शिक्षण क्षेत्रात आर्थिकदृष्टया कमकुवत असणारा गरीबवर्ग मात्र पाठीमागेच राहिला, याची खंत कोणालाही नाही हे विशेष म्हणावे लागेल.
कर्जत शहर हे अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेसाठी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. कर्जत शहरातील शिक्षणसंस्था इतर तालुक्याच्या दृष्टीने निकालाची उत्तम परंपरा कायम राखत आहे. शिक्षणसंस्था आणि येथील अध्यापकवर्ग उत्तम शिक्षणासाठी सर्व परिचित आहे. याच आधारे सध्या कर्जत शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनुदानित शासकीय संस्था आहेत. त्यापाठोपाठ विनाअनुदानित संस्थांनीही आपले चांगले जाळे प्रस्थापित केले आहे. अनुदानित संस्था अल्पदरात उत्तम शिक्षण देत असून, चांगले विद्यार्थी घडवत असून भावी पिढीसह उत्कृष्ट अधिकारी तयार करत आहे. त्याच धर्तीवर विनाअनुदानित संस्था तेच शिक्षण भरमसाठ फी आकारून देत आहे. या खासगी शैक्षणिक संस्थेमुळे मात्र पालकांचे आर्थिक गणित बिघडवत आहे याची जाणीव कोणालाही नाही. 
खाजगी शैक्षणिक संस्था अतिरिक्त शुल्क घेत प्रवेश देत आहेत. यामध्ये उत्तम व लोकांच्या नजरेत भरेल असा शाळेचा गणवेश, आकर्षक सजावटीसह ज्ञान देणारे वर्ग यांची रेलचेल आहे. मध्यमवर्गीय पालक आपले आर्थिक नियोजन इकडे-तिकडे करत आपल्या पाल्यासाठी धावाधाव करत आहेत. मात्र, गरीब कुटुंबियासाठी अशा शाळा केवळ दिव्य स्वप्नच ठरत आहे. गरीब कुटुंबाचा संसाराचा गाड़ा चालवत दमछाक होत असून, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांचीही इच्छा असते, आपल्या मुलांनी चांगले कपडे परिधान करत, नावाजलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घ्यावे, मात्र परिस्थितीनुसार घेता येत नसल्यामुळे, आपल्या अपेक्षांना मुरड घालतात. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थेवर आणि त्यांच्या प्रवेश फीवर कोणाचे तरी निर्बंध असणे गरजेचे बनले आहे. यासह त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या घटकासाठी विशेष योजना राबविणे आवश्यक आहे. तसेच शालेय प्रवेशावेळी एका शासकीय वरिष्ठ अधिकारी नियुक्तिची मागणी विद्यार्थी-पालकवर्गांतून होत आहे.


चौकट- 
आमच्या मुलांना ही उच्च शिक्षण द्यायचे आहे पण...
प्रत्येक पालकांची इच्छा असते की, आपल्या मुलांनी चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेत, उत्तम शिक्षण घेत आपले भवितव्य घड़वावे. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे आमची इच्छा असूनही भरमसाठ फी मुळे आमचे मुले शिक्षण देता येत नाही, अशी भावना एका गरीब काम करणार्‍या पालकांनी दै. लोकमंथनकडे व्यक्त केली.


चौकट
अनेक खाजगी शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षण घेण्याकरीता मोठी फी आकारत आहे. 1 लीसाठी पॅटर्ननुसार काही शिक्षण संस्था 4 ते 5 हजार रूपये घेत असून, पुढील शिक्षणासाठी किती फी आकारली जाऊ शकते, याची कल्पना करणे ही अवघड जात आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे असा सवाल उपस्थित होतो.


चौकट
जिल्हा परिषद शाळाही गुणवत्ताधारक
कर्जत तालुक्यात जि. प. च्या एकूण 118 शाळा आहेत. या शाळा आणि त्यांचे शिक्षकही ई. शाळां सह विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी अविरत झटत आहे. आपल्याकंडील विद्यार्थी इतर खाजगी संस्थाच्या तुलनेत गुणवत्तेत कसे येतील यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत असून स्पर्धेत तग धरून आहेत. कर्जत तालुक्यात अनेक खाजगी शाळांना शिक्षण मंडळाकडून मान्यता दिली आहे. काही वर्षापासून वर्गही सुरू करण्यात आले, मात्र विद्यार्थ्यांना पुस्तके जि. परिषद अथवा पंचायत समितीमार्फ़त अभ्यासक्रमाचे पुस्तके, गणवेश यासह शालेय दफ्तर उपलब्ध केले जात नाही. त्यामुळे भरमसाठ शिक्षण फी भरून पालकांना पुस्तकांचाही अतिरिक्त बोजा पडत आहे. विशेष म्हणजे शासनाच्या धोरणानुसार अभ्यासक्रमाचे पुस्तके ही बाजारपेठेत उपलब्ध होत नाहीत.