मांस विक्रेत्यांचा नगरपालिकेत ठिय्या
कोपरगाव शहर प्रतिनिधी
शहरातील कत्तलखाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना व शहरात मांस विक्रेत्यांवर पोलिसांचे छापे पडत आहेत. त्यामुळे मांस विक्रेते आक्रमक झाल्याचे चित्र आज कोपरगाव नगरपालिकेत पहायला मिळाले. या मांस विक्रेत्यांनी आज {दि. १२} नगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
गेली अनेक वर्षे औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या कत्तलखान्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे त्या परिसरात कोपरगाव नगरपालिकेने कचराडेपो सुरू केला असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील मांस विक्रेत्यांनी आज अचानक नगरसेवक आरिफ करीम कुरेशी यांच्याबरोबर मुख्याधिकारी यांना शिल्पा दरेकर यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे, औद्योगिक वसाहतीतील कत्तलखान्याचे अर्धवट असलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्ह्याधिकारी यांनी सुमारे १ कोटी रुपये मंजूर केले आहे. कत्तलखान्यातील रस्त्यावर सुमारे २५ लाख रुपये खर्च झाला असून त्यावर सध्या घाणीचे साम्राज्य आहे. त्याची स्वछता व्हावी. मागील ४ महिन्यांपासून हा कत्तलखाना बंद असल्यामुळे सुमारे ६०० लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या आठ दिवसांत न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर इरफान कुरेशी, तौफिक कुरेशी, सईद कुरेशी, फैयाज कुरेशी, खलील कुरेशी, सिकंदर कुरेशी, फकीर कुरेशी, शब्बीर कुरेशी आदी मांस विक्रेत्यांच्या सह्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, अभियंता विजय पाटील, जितेंद्र रणशूर आदी आंदोलकांबरोबर चर्चा केली.