Breaking News

ऑपरेशन ’ऑलआऊट’ अंतर्गत चार दहशतवाद्यांचा खात्मा चकमकीत पोलीस शहीद


अनंतनाग/वृत्तसंस्था : शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईला वेग आला आहे. सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली असून चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, चकमकीत एक पोलीस शिपाई शहीद झाला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवारा भागांत ही चकमक सुरू आहे.
दोन ते तीन दहशतवादी दडले असल्याची माहिती सुरक्षारक्षकांना मिळाली. त्यानुसार दिवसाच्या सुरुवातीला कारवाईला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. चकमकीत एका पोलीस शिपाई शहीद झाला आहे. तर, दोन नागरीक जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.पी.वैद यांनी दिली. 
सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पुलवामा जिल्ह्यात गुरूवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस जखमी झाले होते. केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरमध्ये मध्ये लागू केलेली शस्त्रसंधी गेल्या आठवड्यातमागे घेतली. त्यानंतर लष्काराच्या दहशतवादविरोधी कारवाईला वेग आला आहे.
दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांमुळे काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी ‘एनएसजी’ कमांडो सज्ज झाले आहेत. ’ब्लॅक कॅट्स’ची एक तुकडी यापूर्वीच रवाना झाली आहे. काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढल्यामुळे राजकीय अस्थिरता पसरली आहे. आगामी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. एनएसजीची टीमचा काश्मीर खोर्‍यात काही काळ तळ असेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्णयावर अंतिम मोहोर उमटवली आहे. एनएसजीमुळे दहशतवाद्यांची पाळेमुळे खणूण काढणे शक्य होईल. एनएसजी कमांडो जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना प्रशिक्षण देणार आहे. शत्रूचा अचक वेध घेण्याची क्षमता, रूम टू रूम तपासणी या एनएसजी कमांडोंच्या कौशल्याचा फायदा होईल.