सराफ व्यापारी चार लाख रुपयांचे सोने असलेली पिशवी लंपास
सोलापूर - सराफ व्यापारी चार लाख रुपयांचे सोने असलेली पिशवी ठेवून दुकान उघडताना चोरट्याने ती पिशवी लंपास केली. महात्मा फुले व्यापारी संकुलात हा प्रकार घडला. याप्रकरणी व्यापारी विशाल हिंमत लोळगे यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी विशाल लोळगे (वय 40) यांचे महात्मा फुले भाजी मंडईतील महात्मा फुले व्यापारी संकुलातील गाळा क्रमांक एकमध्ये नवशक्ती नावाचे सोने - चांदी विक्रीचे दुकान आहे. ते आणि त्यांचा मुलगा हे सोन्या - चांदीचे दागिने असलेली पिशवी तेथेच बाजूला ठेवून दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप काढत होते. यावेळी चोरट्याने ती पिशवी चोरून नेली. त्या पिशवीत दोन लाख 22 हजार रुपये किमतीचे सोन्याचे नवीन दागिने होते. त्यात बदाम, बाळ्या, रिंग, मणी, डोरले असे एकूण अंदाजे 70 ग्रॅम सोने होते. तसेच 74 हजार 500 रुपये किमतीचे नवीन चांदीचे मोड होते. त्यामध्ये पैंजन, जोडवी असे एक किलो 250 ग्रॅम चांदी होते.
