ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत - राजेंद्र साबळे
सांगली - ठिबक सिंचन योजना सन 2018-19 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 23 मे 2018 पासून सुरू झाली आहे. सन 2018-19 या वर्षामध्ये ठिबक, तुषार संच बसवून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी ई-ठिबक या वेबसाईटवर लाभार्थी नोंदणी आणी अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
साबळे म्हणाले, ठिबक, तुषार सिंचन करू इच्छिणार्या शेतकर्यांसाठी शासनाची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अनुदानाची आहे. इच्छुक शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऍग्री वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत. शेतकर्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच नोंदणीकृत वितरकाकडून ठिबक, तुषार संच बसवून घ्यावेत. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत वितरकाकडून एक महिन्यात संच बसवून अनुदानासाठी परीपूर्ण प्रस्ताव सादर करावा. लाभार्थी नोंदणी करताना अर्जदारांनी संपूर्ण नाव, गवाचे नाव व सातबारा, पिकाचे नाव, पिकाचे अंतर, सुक्ष्म सिंचनचा प्रकार ठिबक / तुषार, गट क्रमांक, गटाचे क्षेत्र, 8 अ प्रमाणे क्षेत्र, राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशील या बाबींची अचुकपणे नोंद करणे गरजेचे आहे.
अर्जदाराने यापूर्वी 7 वर्षाच्या मुदतीमध्ये संबंधित क्षेत्रावर लाभ घेतला असल्यास अथवा त्यांचे 8 अ प्रमाणे असलेले एकूण क्षेत्र संपले असल्यास किंवा त्यांची 5 हेक्टरची उच्चतम मर्यादा संपली असल्यास अशा शेतकर्यांनी अर्ज करू नये. ज्या गटामध्ये पूर्वी 7 वर्षाच्या मुदतीमध्ये लाभ घेऊन क्षेत्र संपले असल्यास असा गट ऑनलाईन करू नये. लागून असलेल्या दोन किंवा अधिक गटाचा मिळून एक अर्ज / प्रस्ताव शक्यतो करू नये. प्रत्येक गटासाठी वेगवेगळा अर्ज करावा. सामाईक क्षेत्राचा अर्ज शक्यतो करू नये कारण भविष्यात वाद उद्भवू शकतो. अपरिहार्य परिस्थितीमध्ये असा अर्ज करणे क्रमप्राप्त असल्यास इतर सर्व सामाईक खातेदाराकडून 100 रूपयेच्या बाँडवर नोटरी करून ना हरकत घेणे अनिवार्य राहील. नाही तर असा अर्ज रद्द केला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. पूर्वसंमती मिळाल्यानंतर पुर्वसंमतीच्या तारखेच्या नंतरच्या तारखेचे बील इन्व्हाईस वेबसाईटवर अपलोड करावे म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही. हेच बील प्रस्तावासोबत जोडावे. एकदा अनुदानाचा लाभ घेतलेल्या संचावर पुन्हा अनुदान घेण्याच्या गैरहेतुने कोणीही अर्ज करू नये. असा अर्ज आढळल्यास संबंधित अर्जदारावर आणी त्यांना बोगस बिल पुरविणारा वितरक या दोघांवरही कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे साबळे यांनी स्पष्ट केले आहे.
