Breaking News

नगरपालिकेला मिळाला पूर्णवेळ अधिकारी


राहुरी विशेष प्रतिनिधी : राहुरी नगरपालिकेचे मुख्यधिकारी नानासाहेब महानवार यांच्यावर प्रशासकीय कामकाजाचा ठपका ठेवून त्यांची देवळालीप्रवरा नगरपालिकेत बदली झाली. त्यांच्या जागेवर धुळे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनुप दुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुरे यांच्या रूपाने नगरपालिकेला पूर्णवेळ अधिकारी मिळाला आहे.

नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवकासह विरोधी गटाचे काही नगरसेवक मुख्यधिकारी महानवार यांच्यावर नाराज होते. पालिकेत प्रशासकीय कामकाजावरुन अंतर्गत अनेकवेळा खटके उडत होते. अखेर आज {दि. १३ } महानवार यांच्या बदलीचा आदेश मिळाला. नव्याने हजर झालेले धुळे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनुप दरे हे शहर विकास आणि पालिकेचे कामकाज सुधारण्यात कितपत यशस्वी होणार, याकडे मात्र शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

नवीन मुख्याधिकारी दुरे यांची प्रशासकीय नियमानुसार नियुक्ती झाली आहे. राहुरी नगरपालिकेला आम्ही पूर्णवेळ कामकाज करणारा मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी केली होती. आता भविष्यात त्यांच्या माध्यमातून शहर विकासाची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू. 

नगरध्यक्ष प्राजक्त तनपुरे.