चतुर्थीनिमित्त भाविकांची सिध्दटेकला मांदीयाळी दर्शनरांगेचा अभाव; शेडच्या अपूर्ण कामाने भाविक उन्हात
शनिवारी पहाटेपासुन भाविक मंदिर परिसरात आले होते. पहाटे श्रीगणेशाची पुजा करुन नैवद्य दाखविण्यात आला. सकाळी साडेसात वाजेपासुन भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढत गेला. बारामती, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर आदी भागातील कित्येक भाविक सिध्दटेकला मुक्कामी आले होते. अनेक भाविक संकष्टी चतुर्थीनिमित्त सिध्दटेकला मुक्कामी आले होते. दिवसभरात राज्याच्या विविध भागातील सुमारे पन्नास हजाराहुन अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. रात्री चंद्रोदयानंतर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कित्येक भाविक उपवास करतात. चंद्रोदयानंतर रात्री श्रीगणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करुन गणपती श्लोक वाचून भाविकांनी उपवास सोडला. चिंचवड देवस्थानच्यावतीने मंदीर परिसरात जागोजागी बॅरिकेट्स लावण्यात आले होते, मात्र सर्व भागात रांगेची व्यवस्था करण्यात आली नव्हती.देवस्थानच्या वतीने मंदीर परिसरात भाविकांसाठी केलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही कोलमडली होती. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मंदीर परिसराची स्वच्छता ठेवण्यात आली होती.
मुदत उलटूनही शेडचे काम अपूर्णच
पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून पावणेदोन कोटी रुपये निधीचे दर्शनरांगेवरील शेडचे काम सुरु आहे. मात्र कामाची मुदत उलटुन तीन महिने पूर्ण झाले तरी, हे काम अपूर्णच आहे. अंगारकी चतुर्थी तसेच या चतुर्थीलाही मोकळ्या सांगाड्यांखाली भाविकांना उन्हाचा तडाखा सहन करीत मंदिरापर्यंत पोहोचावे लागले. मंदिरासमोरील व्यावसायिकांनी ठिकठिकाणी नेट तसेच कापड लावून सावली केल्याने, भाविकांना काहिसा दिलासा मिळाला. पालकमंत्री राम शिंदे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांवर धाक उरला नसल्याने येथील अनेक कामांची वाट लागली आहे.
रसवंतीच्या घुंगराने भाविक हैराण
सिद्धिविनायक मंदीरासमोर तसेच बाहेर वडाच्या झाडाखाली व्यावसायिकांनी अतिक्रमने थाटली आहेत. मंदीरासमोरील वडाच्या झाडाखाली 15 -20 रसवंतीगृहे आहेत.रसवंतीगृहांच्या इंजिन व घुंगरांचा आवाज, व्यावसायिक, विक्रेत्यांच्या आरोळ्यांनी भाविक हैराण झाल्याचे चित्र होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत तसेच नियोजन समिती या प्रश्नावर कसलाच निर्णय घेत नल्याने भाविकांना न्याय मिळत नाही. जयसिंग भैसडे तहसीलदार असताना अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाई होत असल्याने येथे येणार्या भाविकांना त्रास होत नसे.
