Breaking News

महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उपराष्ट्रपती करणार उद्घाटन


पुणे, दि. 21, जून - पुणे महापालिकेच्या विस्तारीत नव्या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते 21 जूनला केले जाणार आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज अशी ही नवी पाचमजली इमारत तब्बल 14 हजार चौरस मीटर क्षेत्रावर विस्तारली असून 72 फूट व्यासाचे गोल घुमटाचे मुख्य सभागृह असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

महापौर दालनासह मुख्य सभेच्या सभागृहात 240 सदस्यांच्या, 150 प्रेक्षकांच्या आणि 60 अधिकार्‍यांच्या बसण्याच्या व्यवस्थेसहीत अत्याधुनिक देखण्या सभागृहाचे लोकार्पण उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नगरपालिकेचे विसर्जन करून 15 फेब्रुवारी 1950 मध्ये महापालिकेची स्थापन करण्यात आली. त्यानंतर सन 1957 मध्ये सध्याच्या इमारतीचे उद्घाटन झाले. सन 1990 मध्ये नूतनीकरण क रण्यात आले. तर आता त्याचा विस्तार करण्यात आला असून तब्बल 14 हजार चौरस मीटर क्षेत्रावरील पाचमजली विस्तारीत इमारतीचे उद्घाटन होत आहे, असे महापौरांनी सांगितले.

इमारतीची माहिती देतांना महापौर म्हणाल्या, ही इमारत ही आधुनिक सुविधांनी सज्ज असून तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित नागरी सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट आ ॅफिस, बँक एटीएम, पीएमपीएलचे पास केंद्र असेल. पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुसर्‍या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्षांची दालने तसचे स्थायी समिती सभागृह, इतर विषय समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत. तर तिसर्‍या मजल्यावर 72 फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभेसाठी सभागृह असणार आहे

ही नवी इमारत ही अत्याधुनिक सोई सुविधांनी सज्ज असून त्यामध्ये अद्ययावत वातानुकूलित यंत्रणा, 6 उद्वाहने, एलईडी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा आणि अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिम बसविण्यात आली आहे. सदर इमारतीचे बांधकाम पर्यावरणपूरक बाबींचा विचार करून करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीनेही अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म सिस्टिम बसविण्यात आली आहे. या सर्व कामासाठी सुमारे 48 कोटी 75 लाख रूपये इतका खर्च आला आहे.