Breaking News

सात खाणचालकांकडून 33.86 लाखांची वसुली


सोलापूर, - विनापरवाना उपसा करीत असलेल्या व वापर परवाना संपलेल्या दगडखाणीवर कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार द क्षिण सोलापूर तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली. सात खाणचालकांकडून 33 लाख 86 हजार रुपयांची वसुली करण्यात आली तर माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, आनंद साळुंके, सुभाष इंगळे, शाम मंठाळकर, प्रमोद हुच्चे, शरणबसप्पा वाले यांच्यासह 21 जणांच्या खाणी बंद करण्यात आल्याची माहिती दक्षिणचे तहसीलदार अमोल कदम यांनी दिली. जे खाणचालक रॉयल्टी, दंडाची रक्कम भरणार नाही, ती खाण बंद करून ती मालमत्ता शासन जमा करून घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार कदम यांनी सांगितले. ज्या खाणचालकांकडे रॉयल्टी, दंडाची रक्कम थकीत होती, त्याची वसुलीही करण्यात आली. खाणचालक आनंद साळुंखे यांच्याकडून 18 लाख 50 हजार, अनुराधा मुधोळकर यांच्याकडून 1 लाख 75 हजार, लक्ष्मण चौगुले यांच्याकडे दीड लाख, अरविंद शिंदे यांच्याकडून 4 लाख 10 हजार, बाळकृष्ण मंत्री यांच्याकडून 3 लाख, वैशाली काळे यांच्याकडून 4 लाख 90 हजार तर प्रवीण डोंगरे यांच्याकडून 10 हजार रुपये इतक्या रकमेची वसुली क रण्यात आली आहे.