Breaking News

नागपुरातून हज यात्रेसाठी पहीले विमान 29 जुलै रोजी

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हज यात्रेसाठी दोन टप्प्यात 2800 यात्रेकरु रवाना होतील. हज यात्रेसाठी पहिले विमान शुक्रवारी 29 जुलै रोजी रवाना होणार आहे. यात्रेकरुंना घेऊन जाण्यासाठी विमानाच्या 19 फे-या अपेक्षित आहेत. हज यात्रेच्या निमित्ताने नागपुरातील हज हाऊसमध्ये लीफ्ट, अग्नीशमन व्यवस्था, पाणी गळती याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांना हज हाऊसची पाहणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. हज समितीच्या वतीने हज हाऊस परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे,हज हाऊस स्वच्छ ठेवणे तसेच यात्रेकरूंसाठी विदेशी चलनाकरिता हज हाऊस येथे नेमलेल्या एजन्सीचे कक्ष स्थापन करण्याचे निर्देश सुद्धा आयुक्तांनी दिले. हज हाऊसकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने तेथील अतिक्रमण महापालिकेने काढण्याची कारवाई करावी. आरोग्य विभागातर्फे यात्रेकरूचे लसीकरण करण्यात यावे, त्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करण्यात यावे. पिण्याचे पाणी पुरवण्यात यावे. हज यात्रेकरूंसाठी विमानतळापर्यंत यात्रेकरूंचे सामान पोहोचविणे तसेच रात्री परतीचा प्रवास करून येणा-या यात्रेकरूंसाठी तंबुची व्यवस्था करणे याबाबतीतही चर्चा करण्यात आली. एका हज यात्रेकरूला विमान प्रवासात 44 किलो एवढ्या कमाल वजनाचे साहित्य सोबत नेता येईल. सोबत 25 हजारापेक्षा जास्त रोख रक्कम असू नये तसेच विमानतळ परिसरात नागपूर मनपातर्फे 4 मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.