26 कोटींच्या निधीपैकी फक्त 50 लाख खर्ची
सोलापूर, दि. 21, जून - जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी सन 2017-18 मध्ये तब्बल 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पण, त्यापैकी प्रत्यक्षात 50 लाखांचा निधी खर्ची पडला. निविदा प्रक्रियेत बांधकाम विभागाची यंत्रणा गुंतल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी अद्याप खर्चित आहे. तीर्थक्षेत्र विकासाची कामे रखडल्याने प्रशासकीय अनास्थेचा फटका जिल्ह्यातील देवी-देवतांना बसल्याचे चित्र आहे.
सन 2017-18 या वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून ’क’ वर्गातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाची 245 कामे सुचविण्यात आली. त्यासाठी 7 कोटी 12 लाख 12 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करू न दिला. तर ’ब’ वर्गातील 79 कामांसाठी शासनस्तरावरून 19 कोटी 54 लाख 79 हजार रुपये याप्रमाणे 324 कामांसाठी 26 कोटी 66 लाख 91 हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेत आला.
बांधकाम विभागाने वेळेत कामे सुरू करण्यासाठी खटाटोप केली नाही. गेली 16 महिने केवळ प्रशासकीय मान्यता घेणे आणि निविदा प्रसिद्ध करण्यात वाया घालविले. उपलब्ध असलेला निधी खर्चायला केवळ 8 महिने शिल्लक असताना धावपळ सुरू करून कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचा आव जिल्हा परिषदेकडून आणला जात आहे. गेल्या 16 महिन्यांत ’क’ वर्गातील केवळ 8 कामे पूर्ण करून त्यावर 40 लाख 16 हजार रुपयांचा खर्च केला आहे. ’ब’ वर्गातील एकही काम अद्यापही सुरू झालेले नाही.