Breaking News

शहरात भूमिगत गटार योजनेचा उडाला फज्जा!


कोपरगाव : गेल्या वर्षी कोपरगाव नगरपालिकेने स्वच्छ शहर सुंदर शहराचे स्वप्न कोपरगावकरांना दाखवले होते. शहर विकासाचे मोठ मोठे फलक शहरात झळकले. त्याचाच एक भाग म्हणजे भूमिगत गटार योजना होय. या अंतर्गत शहरातील अनेक भागांतील रस्त्याच्या कडेला असलेली खोल उघडी गटार पाईप टाकून बंदिस्त करण्यात आल्या. त्यामुळे अरुंद असणारे रस्ते रुंद झाले. परंतु या गटारांवर ज्या ठिकाणी कचरा काढण्यासाठी ढापे टाकण्यात आलेले आहेत, ती नित्कृष्ठ दर्जाची आहेत. त्यामुळे एक वर्षाच्या आतच ते मोडकळीस आलेले आहेत. काही ठिकाणी तर शिल्लकच राहिले नाहीत. 
शहरातील गोदाम गल्ली, भारतीय स्टेट बँकेचा मागील भाग असे अनेक रस्ते आहेत, की त्याठिकाणी गटारीवर ढापेच शिल्लक राहिलेले नाहीत. परिणामी या रस्त्यांवरून जाताना दुचाकीस्वार यात अडकून अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळेस पायी जाणाऱ्या पादचाऱ्यांचे पाय यात अडकून किरकोळ अपघात होत आहेत. दरम्यान, लवकरच पावसाळा येत आहे. गटारांवरील काही ढापे वर्षानुवर्षे बंदच आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून कोपरगावची ‘तुंबलेली मुंबई’ होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.