Breaking News

ग्रामीण टपाल कामकाजाचा बोजवारा


कोपरगाव : ग्रामीण भागाच्या अडीच लाख लोकसंख्येशी निगडीत असलेल्या आणि सामान्यांच्या सुख-दुःखाची दैनंदिन खबरबात ठेवणारे खातेबाहय टपाल कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील टपालांचा बटवडा आणि दैनंदिन आर्थिक कामकाजाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.
सातवा वेतन आयोगासह पेन्शन मिळावी, नोकरीत कायम करण्यात यावे आदी मागण्यांसाठी या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. यासंर्भात वरिष्ठांना नुकतेच निवेदन देण्यात आले. कोपरगांवच्या ग्रामीण भागातील टाकळी, रवंदे, देर्डे को-हाळे, जेउरकुंभारी, कोकमठाण, येसगांव, ब्राम्हणगांव, चांदेकसारे, धारणगांव, मढी कोपरगांव बेट, मूर्शतपूर, संवत्सर, शिंगणापूर, गोधेगांव, शिरसगांव, लोणकरवस्ती, पढेगांव, करंजी या ब्रॅंच पोस्टमास्टर व टपालाचा बटवाडा करणारे पोस्टमास्तर यांच्यासह ३० ते ४० कर्मचा-यांनी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवा युनियनअंतर्गत संप सुरू केला आहे.

केंद्र शासनाने आमच्या मागण्या तातडीने मान्य करून यात तोडगा काढावा. ग्रामीण भागातील पोस्टमास्तर व पोस्टमन खातेबाहय कर्मचा-यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय डाकसेवा युनियनचे कोपरगांव येथील सदस्य हौशिराम भिंगारे, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब आहेर आणि त्यांच्या सर्व सेवकांनी केली आहे.