डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण
राहुरी : डॉ. तनपुरे कारखान्याच्या निवृत्त कर्मचार्यांना न्यायालयाने मंजूर केलेली रक्कम वसूल करून देण्याचा महसूल विभागाला आदेश देण्यात आला होता. दरम्यान, वसूली होत नसल्याने तनपुरे कारखान्याच्या निवृत्त कर्मचार्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचार्यांनी तनपुरे कारखाना कार्यस्थळी दि. १६ मे पासून ३ दिवस उपोषण करणार आहेत. प्रश्न न सुटल्यास जीवनयात्रा संपविण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
डॉ. तनपुरे कारखान्याचे कामकाज सुरू झाले असले तरीही आर्थिक अरिष्ट मात्र कायम आहे. तनपुरे कारखान्याच्या कामकाजात संपूर्ण जीवन अर्पित केलेले बहुतेक कामगार निवृत्ती वेतन, पेंशन फंड, ग्रॅज्यूटी आदी निधी प्राप्त करण्यासाठी आजही लढा देतच आहेत. कामगारांनी न्यायालयात लढा देत असताना अनेक कामगार मयतही झाले. शेवटी न्यायालयाने निवृत्त कर्मचार्यांच्या समस्या लक्षात घेत डॉ. तनपुरे कारखान्याकडून वसूली करत निवृत्त कामगारांची देणी देण्याचा आदेश महसूल विभागाला दिला आहे. त्यानुसार प्राथमिक कार्यवाहीसाठी महसूल विभागाने पुढाकार घेतलाही होता.
कारखाना सुरू झाल्यानंतर कामगारांची देणी दिली जाईल, अशी अपेक्षाही निवृत्त कर्मचार्यांना होती. मात्र, कारखान्यासह महसूल विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने हताश झालेल्या निवृत्त कर्मचार्यांनी उपोषण करीत जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनावर सावळेराम भुजाडी, सोन्याबापू सागर, आसाराम साळवे, सूर्यकांत कोरडे, बन्सी कोंडाजी गाडे, गोविंद काळे, चांगदेव वाळुंज, प्रभू पानसंबळ आदींच्या सह्या आहेत.
