एलईडी लाईट मासेमारीला राज्यात बंदी
सिंधुदुर्गनगरी, दि. 11, मे - देशाच्या सागरी किनारपट्टी भागात केंद्राने एलईडी मासेमारीला बंदी घातली आहे. आता या पाठोपाठ राज्यानेही राज्याच्या 12 सागरी मैल या राज्याच्या हद्दीत एलईडी मासेमारीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांनी दिली. या निर्णयामुळे पारंपारिक मच्छीमारांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. त्यामुळे आता एलईडी लाईटच्या माध्यमातून माशांना आकर्षित करून मत्स्यसाठ्याची लुट करणार्यांना आता चाप बसणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी मासेमारी नौका आणि त्याना साहाय्य करणार्या नौकांवर कारवाई करण्यात येईल अशी अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने जारी केली आहे. केंद्राने देशाच्या सागरी हद्दीत एलईडी मासेमारीस बंदी घातली होती. मात्र राज्याच्या सागरी हद्दीत अशी बंदी नसल्याने पारंपारिक आणि एलईडी मासेमारीस करणार्या मच्छीमारांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या कृषी आणि किसान मंत्रालय, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन विभागाने राज्यासह राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात किंवा जलधी क्षेत्राबाहेर एलईडी लाईट वापरून मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशा सूचना दिल्या आहेत.