त्या तालिमला नगरपरिषदेने ठोकले सील
जामखेड - जामखेड दुहेरी हत्याकांडाशी संबंध असणारी भुतवडा रोडवरील वादग्रस्त तालीम बंद करून पाडण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी नगरपरिषदेकडे ठरावाद्वारे केली होती. त्या अनुशंगाने दि. 22 रोजी सायंकाळी 5 वा. त्या तालमीस नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी सिल ठोकले.
मागील महिन्यात दि. 28 एप्रिल रोजी बीड रोडवरील एका हॉटेल समोर मोटारसायकलवर आलेल्या आरोपींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या झाडुन हत्या केली होती. या हत्याकांडाचा थेट संबंध भुतवडा रोडवरील अमरधाम शेजारी आसलेल्या तालमीशी येत होता. या तालमीस वास्तव्यास आसलेल्या आरोपी गोविंद गायकवाड एक अल्पवयीन मुलगा यांनी इतर साथीदारांच्या मदतीने सदरचे दुहेरी हत्याकांड केले होते. याच तालमीतून गुंड तयार करण्याचे काम होत आहे तसेच या ठिकाणी तलवारी देखील आढळुन आल्या होत्या .
यामुळे ही तालीम वादाच्या भोवर्यात अडकली होती. या प्रकरणी नातेवाईकांनी व महिलांनी संबंधित तालीम नगरपरिषदेने पाडवी अथवा ती ताब्यात घ्यावी यासाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा देखील काढला होता. याबाबत दि 30 एप्रिल रोजी झालेल्या ग्रामसभेत व शांतता कमीटीच्या बैठकीत सदर तालीम पाडण्यात यावी असा ठराव देखील केला होता. या घटनेची नगरपरिषदेने गंभीर दखल घेत दि. 14 मे रोजी घेण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून घेतला होता. ही तालीम पाडण्यात यावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नातेवाईक व नागरिक देखील मागणी करत होते.
