Breaking News

अवैध वाळू उपसा गावकर्‍यांनी रोखला


श्रीरामपूर - प्रवरा नदीपात्रातील करजगाव (ता. राहुरी) येथील वाळू ठेकेदाराने कान्हेगाव (ता.श्रीरामपूर) हद्दीत सुमारे 30 फुटाची हद्द दाखवून वाळू उपसा करण्याचा केलेला प्रयत्न गावकर्‍यांनी उधळून लावला. अवैध उपसा होऊ देणार नाही, असा निर्धार केला. 

करजगाव येथील वाळूचा ठेका नंदकुमार गागरे यांनी घेतला आहे. लिलावानुसार उपसा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी नगर येथील गौणखनिज विभागातील काही कर्मचार्‍यांना हाताशी धरुन नदीपात्रात स्वतःच्या मर्जीप्रमाणे रेखांकन करुन तेथे झेंडे लावले होते. विशेष म्हणजे हा प्रकार कान्हेगाव येथील गावकर्‍यांना विश्‍वासात न घेता करण्यात आला होता. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला. त्याची दखल तहसीलदार अनिल दौंडे यांनी घेतली.
 
तहसीलदार दौंडे यांनी सरपंच गिताराम खरात यांना या संदर्भात कळविले. आज गावातील काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नदीपात्राचे मोजमाप करण्यात आले. सुमारे 30 ते 35 फुट कान्हेगाव हद्दीत केलेल्या खुना काढून टाकण्यात आल्या. त्याऐवजी तहसीलदार दौंडे यांनी मोजमाप करुन नव्याने खुणा करुन दिल्या. ठेकेदाराचा सुरुवातीलाच अनधिकाराने कान्हेगाव हद्दीतील वाळू उपसा करण्याचा प्रयत्न गावकर्‍यांनी हाणून पाडला.