Breaking News

‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये १३ जणांवर कारवाई


कोपरगाव :  शहर पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची धडक कारवाई करत आतापर्यंत १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्तबातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कार्रवाईअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला हद्दपार गुन्हेगार किरण छगन सोनवणे {रा. पंचवटी, मखमलाबाद नाका, नाशिक, हल्ली मुक्काम वज्रेश्वरी मंदिराजवळ, दत्तनगर, कोपरगाव} हा गावठी कट्टा बाळगत असतांना औरंगाबाद-नाशिकरोडवरील डाउच शिवारात माईल स्टोन हॉटेलच्या परिसरात आल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे, पी. एस. आय. वाटोरे, पोलीस कॉन्स्टेबल, वाघ, गवारे, प्रमोद जाधव यांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. पळून जात असल्याने त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला अटक केली. 

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पँटच्या आत लपवलेला २५ हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा आणि रिकामी मॅगझीन आढळून आले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने आतापर्यंत वेगवेगळ्या कारवाईत १३ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये तलवार बाळगणारे सागर हरिभाऊ सोमवंशी, {रा. लक्ष्मीनगर}, महेश चंद्रकांत उगले {रा. दत्तनगर कोपरगाव}, हेमंत भरत चावरे {रा. सुभाषनगर कोपरगाव}, अस्लम उमर कुरेशी {रा. सुभाषनगर, कोपरगाव}, अजय गणेश पाटील {रा. दत्तनगर, कोपरगाव}, तडीपार आरोपी देवा उर्फ देविदास रंगनाथ लोखंडे {रा. तीनचारी, कोपरगाव} आदी आरोपींचा समावेश आहे.