Breaking News

सामाजिक उपक्रम समाजाला वेगळी दिशा देणारे : मालपाणी


संगमनेर : स्व. साहेबराव शिंदे यांच्या जाण्याने परिसरात फार मोठी पोकळी निर्माण झाली, त्यांच्या स्मृती कायम स्वरूपी जागृत राहाव्यात, यासाठी त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे समाजपयोगी उपक्रम राबविले जात आहे, ते सामाजिक उपक्रम नक्कीच समाजाला वेगळी दिशा देणारे ठरणार आहेत, असे मत मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील वाघापूर येथील स्व. साहेबराव शिंदे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्ताने आयोजित उपक्रमाचे उदघाटन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मांची हिल शैक्षणिक संकुलाचे प्रमुख शाळीग्राम होडगर, भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, गणपतराव सांगळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, पं. स. उपसभापती नवनाथ अरगडे, शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष रमेश गोंदकर, डॉ. राजेंद्र खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव शिंदे, कैलासराव पानसरे, सुंनंदा भागवत आदी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाले, स्व. साहेबराव शिंदे हे आपल्यातून गेले असले तरी त्यांचा सुंगध कायम परिसरात दरवळत राहिला आहे. ज्यांच्यावर देव प्रेम करतो त्यांचे नाव नक्कीच चांगल्या अक्षरात कोरले जाईल. या सामाजिक उपक्रमामुळे भारावून गेलो असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, मांची हिल शैक्षणिक संकुलाचे प्रमुख शाळीग्राम होडगर आदींनी मनोगत व्यक्त केले. मालदाड येथील प्रगतशील शेतकरी मछिंद्र नवले यांनी या प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमास मदत म्हणून १० हजाराचा धनादेश प्रतिष्ठान अध्यक्ष किसनराव शिंदे यांच्याकडे यावेळी सुपूर्त करण्यात आला.

त्याचप्रमाणे अमृतेशवर विद्यालय व देवगाव येथील अण्णासाहेब शिंदे विद्यालयास दहा हजार रुपयांची पुस्तके प्रतिष्ठानच्यावतीने भेट देण्यात आली. राजीव गांधी विद्यालय निमज मनोहरबाबा, सायखिंडी अमृतेशवर विद्यालय, संगमनेर खुर्द निलकंठेश्वर विदयालय, निमगाव टेंभी या विद्यालयाच्या होतकरू विदयार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. अर्जुन फुलपगार या अपंग बांधवास तीन चाकी सायकल आणि सुनंदा भागवत यांच्या संस्थेसह गावातील दुर्बल घटकातील दोन मुलींना सायकल वाटप करण्यात आले. साहेबराव शिंदे प्रतिष्ठानचे संचालक नानासाहेब शिंदे यांनी स्वागत केले. संचालक विवेक कासार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दत्तात्रय शेळके यांनी ९० ते शंभर रुग्णांच्या हाडांच्या घनतेची तपासणी केली.एस. एम. बी. टी. महाविद्यालयच्यावतीने ७० ते ८० रुग्णांच्या दातांची तपासणी करण्यात आली. तसेच ३० ते ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संदीप शिंदे यांनी आभार मानले.

स्तुत्य उपक्रमांचे विचार घेऊन जा
समाजातून गेलेल्या व्यक्तीचा स्मृतीदिन साजरा करत असताना किर्तन, प्रवचन आणि जेवणावळी यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. परंतु जी व्यक्ती गेली, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जागृत रहाव्यात तसेच आपण समाजाला आपण काय देऊ शकतो आणि समाजाला कशाची गरज आहे, याची गरज ओळ्खवून त्यांना मदत करणे ही खर्या अर्थाने काळाची गरज आहे. गोरगरीब व दुर्बल घटकातील लोकांना मदत करण्यासाठी साहेबराव शिंदे यांच्या प्रतिष्ठानचा जे समाजपयोगी उपक्रम राबविले जात आहेत, या स्तुत्य उपक्रमांचे विचार घेऊन जा.
गणपतराव सांगळे, भाऊसाहेब थोरात कारखाना संचालक.